मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:37 PM2019-10-10T23:37:15+5:302019-10-10T23:42:40+5:30

देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Overall development of maternal power required: Governor | मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भारतीय महिलांची सद्यस्थिती’वरील अहवालाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशाच्या संस्कृती व संस्कारांचा पाया मातृशक्ती आहे. देश व समाज तिच्या माध्यमातून घडतो. देशाच्या विकासामध्ये मातृशक्तीचे मौलिक योगदान आहे. देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संयुक्तरीत्या आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय महिलांची सद्यस्थिती’ या विषयावरील अहवालाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. 


विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, नीती आयोगाच्या सदस्य बिंदू दालमिया, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू विनायक देशपांडे, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र प्रकल्पाच्या सचिव अंजली देशपांडे, प्रकल्प संचालिका डॉ.मनिषा कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

भारतीय महिलांमध्ये सहनशीलता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसेच त्या जीवनात समाधानी जास्त लवकर होतात. त्यामुळे त्यांचा आनंदी राहण्याचा निर्देशांक हा उच्च आहे. भारतात पितृसत्ताक पद्धतीमध्ये मातृशक्तीला आदराचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. सर्व क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने महिला कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या अहवालातील बाबी या अनेक संदर्भात ऐतिहासिक ठरतील, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. आपल्याला ‘ इंडिया फर्स्ट, फॅमिली फर्स्ट’चे पालन करायला हवे. विधवांना उपेक्षित करणे आपल्या संस्कृतीत नाही, मात्र असे चित्र दुर्दैवाने दिसून येते. महिलांना निर्णयात्मक भूमिकेत सहभागी केल्यास हे चित्र बदलेल. ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये महिलांना आर्थिक स्थितीतून मिळणाऱ्या आनंदात सहभागी करायला हवे. समाजाने मातृशक्ती व देशाच्या विकासात त्यांचे योगदान याचे कौतुक करायला हवे. महिलांचे मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व यातून देश परत महाशक्ती होईल. ‘नीती’ आयोगाला धोरणनिर्मितीत या अहवालातून बरेच सहकार्य होणार आहे, असे मत बिंदु दालमिया यांनी व्यक्त केले. डॉ.देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.कोठेकर यांनी सादरीकरणातून प्रमुख निष्कर्षांवर प्रकाश टाकला. समृद्धी शिरगावकर यांनी संचालन केले.

वास्तविक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न : शांताक्का
भारतीय स्त्री तिच्या कार्यकर्तृत्वाने तिची कुटुंबात, समाजात, देशात व्याप्ती वाढवते. मात्र आजदेखील अनेक महिलांचे शोषण होत आहे. समाजात अनेक प्रकारच्या विकृती आल्या आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांची वास्तविक स्थिती जाणून घेण्याचा विचार केला. महिलांची अंतर्गत शक्ती काय आहे व त्या काय सकारात्मक करू शकतात, हे जाणून घेण्यावर भर दिला. यातून एक मोठे परिवर्तन येऊ शकते. या अभ्यासातून भारतीय मापदंड तयार करण्यात आले, असे प्रतिपादन शांताक्का यांनी केले.

Web Title: Overall development of maternal power required: Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.