उद्यमशीलतेतूनच परिस्थितीवर मात
By admin | Published: May 10, 2015 02:16 AM2015-05-10T02:16:22+5:302015-05-10T02:16:22+5:30
शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची
नागपूर : शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्यासाठी उद्यमशीलता हवी. परंतु सोबतच संवेदनशीलताही आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.
अॅग्रोव्हेट- अॅग्रोइंजिनियर्स मित्र परिवार आणि निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित प्रणय श्रावण पराते लिखित ‘भू-मेह’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गडकरी बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री श्रावण पराते, प्रा. शरद पाटील,धनंजय धार्मिक, शिवनाथ बोरसे, बाबा डवरे, दिलीप मोहितकर आणि ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांनी मी प्रभावित आहे. त्यांचे अनेक विचार डोळे उघडणारे आहेत. सरकार कुणाचेही असो शेतमालाला योग्य भाव कुणीही देऊ शकत नाही. गेली अनेक वर्षे तांदळाला एकच किंमत आहे. तीच परिस्थिती इतर पिकांचीही आहे. त्यामुळे जोडधंदा करण्याची गरज आहे. उद्यमशीलतेतूनच परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्याची गरज आहे. गहू व धानाऐवजी एनर्जी क्रॉप काढा, बाजारात त्याला चांगली मागणी आहे. जागतिक बाजाराचा अंदाज घेऊन उत्पादन करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
नागपुरातील सावजी भोजन हे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दोसा, वडापाव, कॅफे याप्रमाणे सावजी भोजनाचाही ब्रॅण्ड तयार करून चेन तयार करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या देशात अनेक विचार आहेत, मतभिन्नता आहे. परंतु सर्वांचा उद्देश मात्र एकच आहे. तो म्हणजे या देशातील गरिबांना चांगले जगता यावे. तेव्हा एका उद्देशासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शरद निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भू-मेह हे पुस्तक नसून भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमधून निर्माण झालेल्या सामाजिक परिणामांचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी राम आखरे, किशोर ठाकरे, सुनिता उकुंडे, किशोर जिचकार, संजय जैवार, प्रशांत सपाटे आणि स्वाती हुद्दार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन संजय धोटे यांनी केले. प्रा. प्रकाश कडू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)