गव्हावर हरभऱ्याची मात; नागपूर विभागात रबीचे नियोजन क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 09:39 AM2020-11-16T09:39:52+5:302020-11-16T09:40:13+5:30
Nagpur News agriculture यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे.
मंगेश व्यवहारे
नागपूर : रब्बीचे मुख्य पीक गहू समजण्यात येते. परंतु यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, तळे, धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. त्याचा परिणाम म्हणून हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.
कृषी विभागाने यंदा नागपूर विभागातील रबीच्या पिकाचे ३७४४८२ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र १५५९९६.११ हेक्टर आहे तर गव्हाचे नियोजन १२१७८० हेक्टरवर केले आहे. साधारणत: रबीच्या हंगामात गव्हाची पेरणी अधिक होते. पण गेल्या काही वर्षापासून पॅटर्न बदलत आहे. राज्यातही रबीच्या हंगामात हरभरा मुख्य पिकाकडे वाटचाल करीत आहे.
कृषीतज्ज्ञांच्या मते यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. कारण २०१९ मध्ये कपाशीला समाधानकारक भाव मिळाला नाही. परंतु यंदा सलग दोन महिने सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीनवर येलो मोझॅक रोग, स्टेन फ्लाय किडीने अतिक्रमण केल्याने सोयाबीन पुरते नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभऱ्याकडे वाटचाल केली आहे.
- हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची कारणे
हरभऱ्याला मिळणारा चांगला हमीभाव
कमी खर्चाचे पीक
कमी पाण्यात चांगले पीक
यंदा झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे कोरडवाहून शेतकऱ्यांसाठी लाभदायक
तसे गहू हे पंजाबचे मुख्य पीक आहे. गव्हाला साधारणत: १०० दिवसांची थंडी व ६ पाण्याची गरज असते तर दोन पाण्यात हरभऱ्याचे उत्पन्न येते. चांगला हमीभाव, कमी खर्च, जमिनीत असलेला ओलावा यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर कृषी आयुक्तालयाने सुद्धा कडधान्याची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी हरभऱ्याकडे वळले आहे.
डॉ.योगीराज जुमळे, कृषी अधिकारी