‘शालीमार’चा ओव्हर हेड वायर तुटल्याने खळबळ, अनेक गाड्यांचा खोळंबा
By नरेश डोंगरे | Published: November 30, 2024 01:13 AM2024-11-30T01:13:59+5:302024-11-30T01:14:54+5:30
बराच वेळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन दुरूस्ती केल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
नागपूर : शालीमार एक्सप्रेसचा ओएचई वायर तुटल्यामुळे नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. शुक्रवारी दुपारी कामठीजवळ ही घटना घडली. बराच वेळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन दुरूस्ती केल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
कामठीच्या रमानगर रेल्वे चाैकीजवळ ५६४ लेवल क्रॉसिंगवर लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेसचा पेंटो ओएचई (ओव्हर हेड वायर) अडकला आणि त्यामुळे तो तुटून पडला. ज्यामुळे ही गाडी रेंगाळली. ते लक्षात येताच या मार्गावरच्या दोन्हीकडून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे संचालन काही वेळेसाठी बंद करण्यात आले. परिणामी ट्रेन नंबर १२१५१ समरस्ता एक्सप्रेस, १२२२२ हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी एक्सप्रेस जी कामठीकडे निघाली होती, त्या गाड्यांना जागच्या जागीच थांबविण्यात आले. दरम्यान, ओएचई तुटल्याचे कळताच रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांचे पथक तेथे पोहचले. वायर पुरता क्षतिग्रस्त झाल्यामुळे तो दुरूस्त करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यामुळे डाऊन लाईन बंद ठेवून अपलाईन सुरू करण्यात आली. याच लाईनवरून दोन्हीकडच्या गाड्या पास करण्यात आल्या. तब्बल तास दीड तासांच्या परिश्रमानंतर ओएचईची दुरूस्ती करण्यात यश आले. दरम्यान दुरूस्तीच्या कामात विलंब झाल्यामुळे ट्रेन नंबर २०८२५ बिलासपुर-नागपुर वंदे भारत एक्सप्रेस, १२४०९ रायगड़-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस, ०८२८२ बिलासपूर स्पेशल, ०९७१४ बालाघाट मेमू आदी गाड्या प्रभावित झाल्या. मुंबई हावडा एक्सप्रेसलाही बराच वेळ नागपूर स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले.
हावडा लाईनच्या गाड्यांना फटका
या प्रकारामुळे हावडा लाईनवर धावणाऱ्या गाड्यांना जोरदार फटका बसला. या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या एकूणच प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झाला.