रेतीची ओव्हरलाेड वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:06+5:302021-04-25T04:08:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन असले तरी रेतीची वैध व अवैध उचल आणि विना राॅयल्टी ...

Overloaded transport of sand continues | रेतीची ओव्हरलाेड वाहतूक सुरूच

रेतीची ओव्हरलाेड वाहतूक सुरूच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन असले तरी रेतीची वैध व अवैध उचल आणि विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील माथनी येथील टाेल नाक्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये रेतीची ओव्हरलाेड वाहतूक करणारे सात टिप्पर पकडले. या सातही टिप्परमध्ये अंदाजे ७० टन रेती अतिरिक्त असल्याने पाेलिसांनी ते टिप्पर ताब्यात घेत प्रादेशिक परिवहन व महसूल विभागाच्या स्वाधीन केले. ताब्यात घेतलेल्या टिप्पर व रेतीची एकूण किंमत २ काेटी १५ लाख रुपयांच्या आसपास आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २४) पहाटे ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर-भंडारा महामार्गावर गस्तीवर असताना त्यांना भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने माथनी शिवारातील टाेल नाक्याजवळ एमएच-४९/एटी-४४४६, एमएच-४०/बीएल-७९३७, एमएच-४०/बीएल-७३३९, एमएच-४९/एटी-५१८५, एमएच-४०/एके-७२६३, एमएच-४०/बीजी-९३३४ व एमएच-४०/बीजी-३५७२ क्रमांकाचे सात टिप्पर थांबवून कसून तपासणी केली. त्या सर्व टिप्परमध्ये त्यांच्या वाहतूक परवाना व क्षमतेच्या प्रत्येकी १० टन रेती अतिरिक्त असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सर्व टिप्पर ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन व महसूल विभागाच्या ताब्यात दिले.

हे टिप्पर अनुक्रमे लहू सखाराम राेहनकर, रा. म्हाळगीनगर, नागपूर, दीपक बबनराव झाेडे, रा. दिघाेरी, नागपूर, प्रज्वल विठ्ठल आंभाेरे, रा. आजनी, ता. कुही, स्वप्नील चंद्रकांत ठाकरे, रा. गणेशपेठ, नागपूर, यशवंत विश्वनाथ राेकडे, रा. अंबाझरी, नागपूर, जमीर हफीज खान, रा. साईबाबा नगर, खरबी चाैक, नागपूर, कादीर माेहम्मद कुरेशी, रा. हसनबाग, नागपूर यांच्या मालकीची असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार साहेबराव बहाळे, हेडकाॅन्स्टेबल विनाेद काळे, शैलेश यादव, सत्यशील काेठारे, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड यांच्या पथकाने केली.

....

दंडात्मक कारवाईचे संकेत

स्थानिक गुन्हे शाखेने हे सातही टिप्पर ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या स्वाधीन केले. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात वृत्त लिहिस्ताेवर माैदा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली नव्हती. या टिप्पर मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, संकेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. प्रादेशिक परिवहन व महसूल विभाग एकत्रित दंड आकारणार आहेत की वेगवेगळा, याबाबत कर्मचाऱ्यांनी माहिती देणे टाळले.

...

जुजबी दंडाची शक्यता

महसूल विभागात संदर्भात प्रति ब्रास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा व ताे वसूल करण्याचा अधिकार आहे. मात्र, अधिकारी कधीच एवढ्या माेठ्या प्रमाणात दंड आकारत नाहीत. शिवाय, प्रादेशिक परिवहन विभाग रेतीच्या ओव्हरलाेड वाहनांवर फारसा दंड आकारत नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास दंडाची रक्कम जुजबी असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.

Web Title: Overloaded transport of sand continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.