तुम्ही सतत हेडफोन वापरता का.. सावधान! अतिरेक वापराने येतो बहिरेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 04:00 PM2022-02-14T16:00:52+5:302022-02-14T16:16:51+5:30

हेडफोनमधून कानावर १०५ डेसिबल आवाज पडत असल्याने अकाली बहिरेपणा येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

overuse of earphones and headphones cause deafness | तुम्ही सतत हेडफोन वापरता का.. सावधान! अतिरेक वापराने येतो बहिरेपणा

तुम्ही सतत हेडफोन वापरता का.. सावधान! अतिरेक वापराने येतो बहिरेपणा

Next
ठळक मुद्दे१८ ते २५ वयोगटांमध्ये बहिरेपणाची लक्षणे

लोकमत इन्फोग्राफिक्स

नागपूर : मोबाइल आणि त्यावर गाणी ऐकणे हे आता काही नवीन नाही. रात्री झाेपण्यापूर्वी तर दिवसा वाहन चालवताना बहुतेक जण कानात हेडफोन टाकून गाणी ऐकतात; पण हेडफोनचा अति वापर करणाऱ्या विशेषत: १८ ते २५ वयोगटांमध्ये बहिरेपणाची लक्षणे दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

९० डेसिबल आवाजाने बहिरेपण

कानाचे तीन भाग असतात. बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असेही म्हणतात. अंतर्कर्ण (शंख किंवा गाभारा) म्हणजे हाडाच्या पोकळीत बसवलेला गाभारा किंवा एक नाजूक शंख. त्या शंखाचे मुख्य काम म्हणजे ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंतर्फे मेंदूपर्यंत पोचवणे. याला तीन अर्धवर्तुळाकार नळ्या जोडलेल्या असतात. त्यांना एकत्र जोडणारा छोटा फुग्यासारखा भाग असतो. या शंख व नळ्या तोल-स्थिती-गती यांच्याबद्दल मेंदूकडे संदेश पाठवतात. ९० डेसिबलपर्यंतचा आवाज चेतातंतूंना इजा करतात. यामुळे बहिरेपण येते. धक्कादायक म्हणजे, हेडफोनमधून कानावर १०५ डेसिबल आवाज पडत असल्याने अकाली बहिरेपणा येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

-बहिरेपणासाठी हे वॉर्निंग

बहिरेपण हे अचानक येत नाही. त्याच्या काही वॉर्निंग आहेत. यात हेडफाेन न वापरताही कानात आवाज ऐकू येणे. रेडिओ किंवा कूकरच्या शिटीसारखा आवाज ऐकू येणे. कान बुजल्यासारखा वाटणे. ही लक्षणे असतील तर त्वरित ईएनटी डॉक्टरांना दाखविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-झोपेत अडथळा

गाणी ऐकत झोपल्यामुळे मेंदूचा काही भाग सतत कार्यरत राहतो. त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. याच कारणामुळे शरीराला आवश्यक ८ तासांची झोप मिळत नाही. तसेच हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे नुकसानकारक आहे. झोपताना उच्च आवाजात इअरफोन लावून गाणी ऐकल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात.

-कानाच्या नसांवर पडतो प्रभाव

कानाचा पडद्याला असलेले छिद्र किंवा कानाची हाडे एकमेकांपासून वेगळी असल्यास बहिरेपणा येतो. याला वैद्यकीय भाषेत ‘कंडेक्टिव्ह हेअरिंग लॉस’ म्हणतात. यावर शस्त्रक्रिया करून बहिरेपणा दूर करता येऊ शकतो. मोबाइलचा किंवा हेडफोनच्या अतिवापरामुळे ‘कंडेक्टिव्ह हेअरिंग लॉस’ होत नाही; परंतु ‘सेन्सॉरिनुरल हेअरिंग लॉस’ होतो. म्हणजे कानाचा नसांवर याचा प्रभाव पडतो. आणि कर्णयंत्र वापरण्याशिवाय यावर दुसरा उपचार राहत नाही.

-डॉ. नितीन देवस्थळे, प्रमुख, ईएनटी विभाग, लता मंगेशकर हॉस्पिटल

:: हेडफोन वापरताना हे करा

- हेडफोनचा सतत वापर करू नये.

- हेडफोनचा आवाज त्याच्या क्षमतेच्या सात टक्के ठेवावा. उदा. आवाजाची क्षमता २० असेल तर १२ ठेवावे.

- हेडफोन एक तासाच्या वर वापरू नये.

- कानाबाहेर लावता येणाऱ्या हेडफोनचा वापर करावा.

-गर्दीच्या ठिकाणी हेडफोनचा वाढविलेला आवाज शांत किंवा कमी आवाजाच्या ठिकाणी तो कमी करण्यास विसरू नये.

Web Title: overuse of earphones and headphones cause deafness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य