नागपुरात मांजात अडकून घुबड जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:18 PM2019-12-31T22:18:35+5:302019-12-31T22:20:46+5:30
मानेवाडा येथील वंदेमातरम् कॉलेज जवळील अवधूत नगरात राहणारे गोपाल धांडे यांच्या घरी मंगळवारी सकाळी एक पांढऱ्या रंगाचे घुबड मांजात अडकून जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानेवाडा येथील वंदेमातरम् कॉलेज जवळील अवधूत नगरात राहणारे गोपाल धांडे यांच्या घरी मंगळवारी सकाळी एक पांढऱ्या रंगाचे घुबड मांजात अडकून जखमी झाले. त्याला तातडीने मदत मिळवून मुक्त केले व उपचारासाठी पाठविण्यात आले.
सकाळी ९ वाजताच्या दरम्यान धांडे यांच्या घरी असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये एक जखमी घुबड कोसळले.याची माहिती सर्पमित्र आणि पक्षिमित्र शुभम पराळे याला अन्य पक्षिमित्र आशिष मेंढे यांच्याकडून कळली. शुभमने घटनास्थळी धाव घेऊन जखमी घुबडाला मांजातून मुक्त केले. त्याच्या पायाला जबर दुखापत झालेली होती. त्यामुळे वन विभागाच्या रेस्क्यु पथकाला या संदर्भात सूचना देऊन त्याच्यावर उपचार करण्याची विनंती केली. वनरक्षक मुसळे यांनी सहकाऱ्यांसह येऊन घुबडाला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रवाना केले.
या परिसरातील विजेच्या खांबावर नॉयलॉन मांजा गुंतला होता. त्यात अडकल्याने हे घुबड जखमी होऊन खाली पडले. त्यामुळे त्याच्या पायाला जबर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.
मकरसंक्रांतीचा आनंद पक्ष्यांच्या जीवावर
जानेवारी महिना आला की पतंगबाजी सुरू होते. मकरसंक्रातीच्या काळात तर मोठ्या प्रमाणावर पतंग उडविल्या जातात. यात नॉयलॉन मांजा वापरला जात असलयाने पक्ष्यांची मोठी हानी होते. बरेचदा दुचाकीवरून जाणारे नागरिकही जखमी होतात. हे अपघात टाळण्यासाठी साधा मांजा वापरा, असे आवाहन सर्पमित्र शुभम पराळे याने के ले आहे.