पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या नराधम वडिलास मरेपर्यंत जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 09:06 PM2017-11-24T21:06:29+5:302017-11-24T21:07:16+5:30
वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी पीडित मुलगी ही १६ वर्षांची होती. ती शेतमजुरी करायची. आई वेडी असल्याने ती कुठेतरी निघून गेली होती. त्यामुळे आरोपी वडिलाने दुसरे लग्न केले होते.
नराधमाने गाठला विकृतीचा कळस
२१ मार्च २०१५ रोजी पीडित मुलीची सावत्र आई आपल्या मुलांसोबत माहेरी गेली होती. त्यामुळे हा आरोपी आणि पीडित मुलगी घरी होते. आरोपी वडील रात्री जेवण करून बाहेर अंगणात बसला होता. मुलीने रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण केले आणि ती घराचा दरवाजा न लावता घरात खाटेवर झोपली. त्याच वेळी नराधम पिता घरात येऊन त्याने आतून दार बंद करून घेतले होते. त्याने मुलीवर बलात्कार केला होता. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. मध्यरात्रीनंतर पुन्हा त्याने बलात्कार केला होता.या घटनेच्या पूर्वी दिवाळीत या मुलीची सावत्र आई आपल्या माहेरी गेली असता, या नराधमाने पीडित मुलीवर पाच-सहा वेळा बलात्कार केला होता.
अखेर अत्याचार असह्य झाल्याने तिने २२ मार्च २०१५ रोजी कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भादंविच्या ३७६(२)(एन)(आय),५०६ आणि लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ४,८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी आरोपी नराधम वडिलाला अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक एल.बी. ढेंगरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी वडिलाला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पीडित मुलगी निराश्रित असल्याने तिच्या पुनर्वसनाची गरज आहे. त्यामुळे तिला अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची शिफारस न्यायालयाने सक्षम अधिकाऱ्यांकडे केली आहे.
न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर तर आरोपीच्यावतीने अॅड.संजय जोगेवार यांनी काम पाहिले. नागपूर ग्रामीणचे जिल्हा समन्वय अधिकारी उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार रमेश भुसारी, अरुण भुरे, प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल विजयानंद सांदेकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.