नियमानुसार जिम व शॉपिंग मॉल सुरू करण्याची मालकांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:21 AM2020-07-24T00:21:54+5:302020-07-24T00:24:21+5:30
तब्बल चार महिन्यानंतर राज्यातील व्यायामशाळा (जिम) अणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्याचे संकेत राज्य शासनाने बुधवारी दिले आहेत. शासनाने तारीख निश्चित करावी. शासनाच्या निर्णयामुळे जिम आणि शॉपिंग मॉल मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार सुरू करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया जिमचे मालक, ट्रेनर आणि शॉपिंग मॉलच्या संचालकांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल चार महिन्यानंतर राज्यातील व्यायामशाळा (जिम) अणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्याचे संकेत राज्य शासनाने बुधवारी दिले आहेत. शासनाने तारीख निश्चित करावी. शासनाच्या निर्णयामुळे जिम आणि शॉपिंग मॉल मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार सुरू करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया जिमचे मालक, ट्रेनर आणि शॉपिंग मॉलच्या संचालकांनी लोकमतशी बोलताना दिली.
राज्य शासनाच्या लॉकडाऊननंतर १९ मार्चपासून जिम आणि शॉपिंग मॉल आतापर्यंत बंद आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या बँकांचे कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज भरण्यास अडचणी येत आहेत. चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार तर सोडा घरखर्चही चालविणे कठीण झाले आहे. बँकांचा हप्ते भरण्यासाठी तगादा सुरू असून जिममधील उपकरणे जप्त करण्याची धमकी देत आहेत. जिम हे जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. असे असतानाही शासनाने सुरू करण्यास परवानगी का दिली नाही, हे एक कोडेच आहे. पण चार महिन्यानंतर जिम आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी दिल्याने उत्साह आहे. नव्याने व्यवसाय सुरू करण्याची आमची तयारी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शॉपिंग मॉलमध्ये रेडिमेड गारमेंट अपडेट करावे लागतील, असे स्पष्ट केले.
अटी व नियमांचे पालन करू
शासनाच्या संकेतानंतर मॉल सुरू करण्याची तयारी चालविली आहे. शासनाच्या अटी व नियमांचे पालन करण्यावर भर राहील. कर्मचाºयांचा आॅक्सिझन स्तर आणि तापमान दररोज मोजण्यात येईल. कमी संख्येत ग्राहकांना मॉलमध्ये सोडण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि ग्राहकांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. ट्रायल केलेले कपडे २४ तास वेगळे ठेवण्यात येतील. संसर्ग होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊ.
हरीश मंत्री, श्री शिवम मॉल.
शासनाने तारीख निश्चित करावी
जिम सुरू झाल्यानंतरच आर्थिक स्थिती रुळावर येण्याची अपेक्षा आहे. शासनाचा निर्णय योग्य आहे. जिमचा संपूर्ण परिसर आणि उपकरणे सॅनिटाईझ करू. गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्यांच्या वेळा निश्चित करू. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढते. मास्क, विशिष्ट कपडे आणि सॅनिटायझरचा उपयोग करण्यात येणार आहे. शासनाने तारीख निश्चित करावी.
गजानन कुंभारे, संचालक, ऑलिम्पिया फिटनेस.
चार महिन्यांपासूनची मागणी पूर्ण होणार
गेल्या चार महिन्यांपासून जिम सुरू करण्याची मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे. शासनाने निश्चित केलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच जिम सुरू करण्यात येणार आहे. व्यायाम आरोग्यासाठी उत्तम आहे. बंदीमुळे सर्व बचत संपली असून घर चालविणे कठीण झाले आहे. जिम सुरू झाल्यास थोडाफार आर्थिक आधार मिळेल. जिमवर अवलंबून असणाऱ्या ट्रेनरचा खर्च चालेल.
महेश रहांगडले, संचालक, बिग जिम.
आर्थिक स्थिती खराब
जिम बंद झाल्याने आर्थिक स्थिती खराब झाली आहे. चार महिन्यांपासून आर्थिक मिळकत बंद झाली आहे. घर चालविणे कठीण झाले आहे. लोक घरी प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी देत नाही. जिम सुरू झाल्यानंतर लोक येतील, तेव्हाच उत्पन्न मिळेल. शासनाने जिम सुरू करण्यासाठी लवकरच तारखेची घोषणा करावी.
नीतू बागडे, ट्रेनर.