ऑक्सिजन १५३८ तर, आयसीयूचे १९८ बेड रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:59+5:302021-05-11T04:08:59+5:30
नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोनाचा गंभीर रुग्णांनाही ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले होते. मेयो व मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर ...
नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोनाचा गंभीर रुग्णांनाही ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले होते. मेयो व मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर दोघांना ठेवण्याची वेळ आली होती; परंतु आता चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. मागील नऊ दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनच नव्हे तर आयसीयूचे बेड रिकामे राहू लागले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचे १५३८ तर आयसीयूचे १९८ बेड रिकामे होते; परंतु व्हेंटिलेटरचे चारच बेड शिल्लक असल्याने ते वाढविण्याची गरज आहे.
नागपूर शहरात १५२ खासगी हॉस्पिटल, १४ शासकीय तर १६ कोविड केअर सेंटरमधून कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे २७३६, आयसीयूचे १७४४ तर व्हेंटिलेटरचे ३५३ बेड आहेत. तर, शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे २११७, आयसीयूचे ५२३ तर व्हेंटिलेटरचे २२७ बेड आहेत. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे ९२६, आयसीयूचे १९६ तर व्हेंटिलेटरचे ४ बेड रिकामे होते. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे ५२०, आयसीयूचे २ तर व्हेंटिलेटरचा एकही बेड रिकामा नव्हता. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचे ९२ बेड रिकामे होते.
-आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची कमी
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता दिसून आली. सध्याच्या स्थितीत शासकीय व खासगी मिळून आयसीयूचे २,२६७ तर व्हेंटिलेटरचे ५८० बेड आहेत; परंतु ४ हजारावर रुग्णसंख्या जाताच हे बेड फुल्ल होतात. सध्या तिसऱ्या व चवथ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने या दोन्ही बेडमध्ये वाढ होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.