वर्गणी गोळा करून मेळघाटमध्ये दिले ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:14+5:302021-05-09T04:09:14+5:30
नागपूर : आदिवासीबहुल मेळघाटात आता कोरोना संसर्ग वाढायला लागला. अशा स्थितीमध्ये व्हीएनआईटीच्या प्राध्यापकांनी आणि वंजारीनगर क्रिकेट क्लबने मदतीचा हात ...
नागपूर : आदिवासीबहुल मेळघाटात आता कोरोना संसर्ग वाढायला लागला. अशा स्थितीमध्ये व्हीएनआईटीच्या प्राध्यापकांनी आणि वंजारीनगर क्रिकेट क्लबने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध केले आहेत. एवढेच नाही तर भविष्यातही कॉन्सेंट्रेटर देण्याची तयारी दर्शविली आहे.
सुमारे २५० किलोमीटर अंतरावर दूरवर पसरलेल्या मेळघाटसारख्या दुर्गम भागामध्ये कर्माग्राम येथील महान ट्रस्टच्या महात्मा गांधी रुग्णालयामार्फत आरोग्यसेवा दिली जात आहे. ट्रस्टचे डॉ. आशिष सातव यांनी व्हीएनआईडीचे प्रोफेसर असलेले वंजारीनगर येथील डॉ. दिलीप पेशवे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची नितांत गरज असल्याचे कळविले. डॉ. पेशवे यांनी ही माहिती वंजारीनगर क्रिकेट क्लब आणि आपल्या सहकारी प्राध्यापकांना दिली. सर्वांनी एकत्रित रक्कम जमा केली. बघता बघता एक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरपुरती रक्कम जमा झाली. डॉ. पेशवे यांनी आपल्या पैशातून पुन्हा एक कॉन्सेंट्रेटर खरेदी केले. हे दोन्ही कॉन्सेंट्रेटर महान ट्रस्टला सुपुर्द करण्यात आले.
या मदतीसाठी अजूनही वर्गणी येतच आहे. त्यातून पुन्हा दोन कॉन्सेंट्रेटर खरेदी करून ट्रस्टकडे सुपुर्द केले जाणार असल्याचे सी. ए. माधव विचोरे यांनी सांगितले.