ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स झाले आऊट ऑफ स्टॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 08:35 AM2021-04-23T08:35:41+5:302021-04-23T08:38:23+5:30
Coronavirus in Nagpur कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असून गृहविलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु विदर्भातच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे दर दुपटीने महागले आहेत.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असून गृहविलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु विदर्भातच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे दर दुपटीने महागले आहेत. कंपन्यांकडे मालच आऊट ऑफ स्टॉक असल्याने नवीन मशीनची खरेदी जवळपास बंद असून, भाड्याने मशीन हवी असेल तरी दर दुपटीहून अधिक आकारले जात आहेत. यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची अडचण झाली आहे.
सद्यस्थितीत दवाखान्यात बेड्स उपलब्ध नसल्याने तुलनेने कमी ऑक्सिजनची गरज असलेले अनेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शहरातील अनेक डिस्ट्रिब्युटर्सकडून याची विक्री होते व यांना महिन्याच्या हिशेबाने भाड्यावरदेखील देण्यात येते. परंतु मागील दीड महिन्यापासून यांचीदेखील बाजारात कमतरता झाली आहे. मुंबई किंवा इतर राज्यातून स्टॉक येणे बंद झाले आहे. त्यामुळे नवीन मशीन विक्रीला उपलब्ध नाहीत. काही विदेशी कंपन्यांचा माल येण्याची शक्यता आहे. मात्र त्याचे दरदेखील खूप जास्त आहेत.
भाड्याने मशीन मिळविण्यासाठी धडपड
अनेक वितरक व वैद्यकीय उपकरणे पुरविणाऱ्यांकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भाड्यानेदेखील देण्यात येतात. मात्र सध्या याच्या बुकिंगसाठीदेखील वेटिंग आहे. महिन्याला सर्वसाधारणतः सहा हजार रुपयाचे भाडे आकारले जायचे. आता तो आकडा १५ हजाराहून अधिकवर गेला आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णांनी अगोदर मशीन्स नेल्या होत्या व त्या आता त्यांच्या नातेवाईकांसाठीदेखील वापरण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी मशीन पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे.
वितरकदेखील हैराण
यासंदर्भात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरक मोहन तावाडे यांच्याशी संपर्क साधला असता बाजारात साठाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत चीन किंवा तायवानहून माल येणार नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहील. पाच लिटरची मशीन २५ हजारापर्यंत मिळायची. आता त्याचे दर ५५ हजाराहून अधिक झाले आहेत. आम्हाला दररोज भाड्याने मशीन द्या म्हणून शेकडो फोन येतात. मात्र आम्हीदेखील साठा नसल्याने हतबल आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये पीएसए (प्रेशन स्विंग ॲबसॉर्पशन) तंत्र वापरले जाते व यात सभोवतालची हवा शोषल्या जाते. त्यातून नायट्रोजन वेगळा केला जातो व या प्रक्रियेत ऑक्सिजन तयार होते. सर्वसाधारणतः पाच लिटरहून कमी ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना ही मशीन वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येतो. विशेष म्हणजे ऑक्सिजनला वारंवार रिफिल करण्याची आवश्यकता यात नसते.