नागपुरात ‘अॅम्ब्युलन्स’मधील ‘ऑक्सिजन सिलेंडर’ ठरला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:20 AM2019-04-17T00:20:17+5:302019-04-17T00:21:28+5:30
साधारणत: रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांसाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. मात्र प्राणवायू साठवून ठेवणारे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णासाठी प्राणघातक ठरले. संविधान चौकात रुग्णवाहिकेतील एका रुग्णाच्या डोक्यावर ‘सिलेंडर’ पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांसाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. मात्र प्राणवायू साठवून ठेवणारे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णासाठी प्राणघातक ठरले. संविधान चौकात रुग्णवाहिकेतील एका रुग्णाच्या डोक्यावर ‘सिलेंडर’ पडल्याने त्याचा मृत्यू झाला. धम्मदीपनगर येथील अजय चंद्रभान वानखेडे (५०) असे मृताचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
पेंटिंगचे काम करणाऱ्या वानखेडे यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होती. तोंडात फोड झाल्यामुळे त्यांना ११ एप्रिल रोजी सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी मेयो इस्पितळात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांचे नातेवाईक त्यांना सकाळी ११.१५ वाजता मेयोकडे नेत होते. रुग्णवाहिकेत अजय यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा व दोन नातेवाईक होते. अजय यांना ‘सिलेंडर’च्या माध्यमातून प्राणवायू देण्यात येत होता. हे ‘सिलेंडर’ नातेवाईकाने पकडले होते तर आणखी एक ‘सिलेंडर’ स्ट्रेचरजवळ ठेवण्यात आले होते. संविधान चौक येथे अचानक ऑटो समोर आल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे स्ट्रेचरजवळ ठेवलेले ‘सिलेंडर’ अजय यांच्या डोक्याला लागले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांनादेखील जखम झाली. दोघांनाही मेयोमध्ये दाखल करण्यात आले. अजय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीताबर्डी पोलिसांनी आकस्मित मृत्यूचे प्रकरण दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.