ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:48+5:302020-12-23T04:06:48+5:30
नागपूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा पडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. स्वत: शासनाला ...
नागपूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा पडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. स्वत: शासनाला यात लक्ष घालावे लागले. या महिन्यात तब्बल ६० टन ऑक्सिजन लागले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी होऊ लागताच ऑक्सिजनच्या मागणीतही घट आली. नोव्हेंबर महिन्यात ५० टक्क्यांनी मागणी कमी होऊन ३० ते ३५ टनांवर आली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाबाधितांवरील उपचारामध्ये ऑक्सिजन थेरपीचे अधिक महत्त्व आहे. बहुसंख्य रुग्णांना ही थेरपी दिली जाते. यामुळे मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येताच ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ झाली. या महिन्यात मेडिकलला २,३१४ जम्बो आकाराचे सिलिंडर, तर ३९,७८६ क्युबिक मीटर लिक्वीड ऑक्सिजन लागले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुपटीने रुग्णसंख्येत वाढ होताच जम्बो सिलिंडरच्या मागणीत वाढ होऊन ती १३,४२८ वर गेली. ८४,९८९ क्युबिक मीटर लिक्वीड ऑक्सिजन लागले. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात अधिक ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली. या महिन्यात १४,३७० जम्बो सिलिंडर तर १,५१,४७९ क्युबिक मीटर लिक्वीड ऑक्सिजन लागले. मात्र, ऑक्टोबर महिन्यात प्रादुर्भाव कमी होताच ऑक्सिजनच्या मागणीत घट आली. ८,९३१ जम्बो सिलिंडर, १,०४,०१३ क्युबिक मीटर लिक्वीड ऑक्सिजन लागले. मागील दीड महिन्यात ही मागणी आणखी कमी झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ६० टन ऑक्सिजन लागले. परंतु नोव्हेंबर महिन्यात ५० टक्क्यांनी मागणीत घट आली.
मेडिकलमध्ये २० हजार क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटल म्हणजे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लिक्वीड ऑक्सिजन प्लांट नसल्याने मोठ्या प्रमाणात सिलिंडर लागायचे. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी २० हजार क्युबिक मीटरचा लिक्वीड ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. स्फोटक विभागाची परवानगी मिळताच पुन्हा ट्रॉमा केअर सेंटर कोविड रुग्णांच्या सेवेत सुरू होईल. सध्या येथील रुग्ण मेडिकलच्या मुख्य इमारतीच्या वॉर्डात ठेवण्यात आले आहेत.