जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’

By कमलेश वानखेडे | Published: July 20, 2024 05:38 PM2024-07-20T17:38:31+5:302024-07-20T17:40:23+5:30

नितीन गडकरी : जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर

'Oxygen Park' to be started on Jamtha Ring Road | जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’

'Oxygen Park' to be started on Jamtha Ring Road

नागपूर : पूर्णपणे पक्ष्यांसाठी समर्पित असा ‘बर्ड पार्क’ आणि सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध हवा देणारा ॲाक्सिजन पार्क अशी अनोखी भेट पुढील महिन्यात नागपूरकरांना देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार केली.

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थ पर्यटनासाठी आणखी एक इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून त्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी यांनी ‘ॲाक्सिजन पार्क’ची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर हा ॲाक्सिजन पार्क निर्माण केला आहे. ना. श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून हा पार्क साकारण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग पार्कनंतर आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण नागपूरकरांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या पार्कमध्ये एक कॅफे, सायकल ट्रॅक, फक्त पक्ष्यांसाठी असलेली फळझाडे आदींचा समावेश असेल. येथील फळांवर फक्त पक्ष्यांचा अधिकार असेल, असेही गडकरी यांनी सांगितले. तत्पूर्वी, जायका मोटर्सचे मुख्य संचालक कुमार काळे यांनी गडकरी यांना वातानुकुलित इलेक्ट्रिक बसची चावी दिली. यावेळी टाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक आनंद खरवडीकर, उपमहाव्यवस्थापक सुधीर भाले, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, डॉ. संजय उगेमुगे, मोहन पांडे यांची उपस्थिती होती.

नागपूर ते माहूर धावणार इलेक्ट्रिक बस
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे ही बस ज्येष्ठांना धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या सहलीसाठी देण्यात येईल. नागपूर ते माहुर असा प्रवास ही बस करेल. विशेष म्हणजे ही बस निःशुल्क तत्वावर चालविण्यात येणार आहे. एका चार्जिंगमध्ये अडीशे किलोमीटरचा प्रवास करण्याची बसची क्षमता आहे.

Web Title: 'Oxygen Park' to be started on Jamtha Ring Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.