खापरखेडा वीज केंद्रातील ऑक्सिजन प्लांट कामठी उपजिल्हा रुग्णालयात स्थानांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:23+5:302021-05-01T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा आणि स्वयंपूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचे पालन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा आणि स्वयंपूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचे पालन करीत खापरखेडा वीज केंद्रातील ऑक्सिजन प्लांट कामठी उपजिल्हा रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
ऑक्सिजन पुरवठ्याची खर्चाची जबाबदारी महानिर्मिती घेणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
खापरखेडा व कोराडी येथील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे का? याची चाचपणी करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री राऊत यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व वीजनिर्मिती केंद्रांच्या वरिष्ठ अभियंत्यांना तातडीने या संदर्भाची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले होते. आता यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली असून खापरखेडा येथील ऑक्सिजन प्लांट थेट कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सुस्पष्ट निर्देश खापरखेडा वीजनिर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. शक्य तितक्या लवकर यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करून ऑक्सिजन पुरवठा सुरू होईल, यासाठी लक्ष वेधावे, असे या पत्रात नमूद केले आहे.
या ऑक्सिजन प्लांट स्थानांतरण, उभारणी आणि संचालन प्रक्रियेत लागणारा सर्व खर्च महानिर्मिती सामाजिक बांधिलकीतून कोविड रुग्णांसाठी करणार असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी स्पष्ट केले आहे.