आयुष हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा प्रणालीत बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:38+5:302021-04-23T04:08:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सिजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी ...

Oxygen supply system failure at AYUSH Hospital's Kovid Center | आयुष हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा प्रणालीत बिघाड

आयुष हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा प्रणालीत बिघाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सिजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे पथक तसेच पोलिसांचा ताफा तत्परतेने घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

राजभवनाच्या बाजूला आयुष हॉस्पिटलमध्ये नुकतेच हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ४५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दुपारी ४.३०च्या सुमारास ऑक्सिजनचा सर्वत्र गंध पसरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांमध्ये कुजबुज सुरू झाली. त्यानंतर काही रुग्णांना ऑक्सिजन सुरळीत मिळत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या ध्यानात आले. त्यामुळे येथे एकच धावपळ निर्माण झाली. ऑक्सिजन गळती सुरु झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे ती प्रशासनाच्या कानावरही गेली. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे एक पथक, अग्निशमन दल तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. ऑक्सिजन सिलिंडरमधील मुख्य कॉक बिघडल्याने वायूगळती सुरू झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच या बिघाडाची दुरुस्ती केली आणि ऑक्सिजन प्रणाली सुरळीत केली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधील सर्व सिलिंडरची तपासणी करून ते व्यवस्थित आहेत की नाहीत, त्याचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तास दुरुस्ती करणारे पथक रुग्णालयातच थांबले होते. सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री केल्यानंतर या पथकाने रुग्णालय सोडले.

---

नाशिकची पुनरावृत्ती टळली

नाशिकच्या घटनेमुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. अशात ही घटना घडल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे तर रुग्णालय प्रशासनात आणि जिल्हा प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली होती. यावेळी घटनास्थळावरून रुग्णांना हलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकाही बोलावण्यात आल्या होत्या. सुदैवाने नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली.

---

Web Title: Oxygen supply system failure at AYUSH Hospital's Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.