वायूसेनेच्या विमानाने विदर्भासाठी येणार ऑक्सिजन टॅंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:54+5:302021-05-06T04:07:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असून मुबलक ...

Oxygen tanker to reach Vidarbha by Air Force aircraft | वायूसेनेच्या विमानाने विदर्भासाठी येणार ऑक्सिजन टॅंकर

वायूसेनेच्या विमानाने विदर्भासाठी येणार ऑक्सिजन टॅंकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असून मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी वायुदलाच्या विशेष विमानाने ऑक्सिजन टँकर रवाना झाले आहेत. पुढच्या २० तासानंतर रेल्वेने हे टँकर नागपुरात पोहोचणार आहेत.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, भिलाई येथून ११० मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला नियमित मिळत आहे, तो पुरवठा यापुढेही सुरू राहील. मात्र वाढती मागणी लक्षात घेता, अतिरिक्त ऑक्सिजन पुढील २० ते २५ तासानंतर भुवनेश्वरनजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लान्ट येथून नागपूरला मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा करून तेथील गरज भागवता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

नागपूरला १ मे रोजी ९३ मेट्रिक टन, २ मे रोजी २२० मेट्रिक टन, ३ मे रोजी १११ मेट्रिक टन, ४ मे रोजी ६० मेट्रिक टन तर ५ मे रोजी ११८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. नागपूर शहरातील मोठी मागणी, याशिवाय नागपूर ग्रामीण व अन्य जिल्ह्यालादेखील यातूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र ही संख्या अपुरी असून, यासाठी केंद्राच्या वायुदलाच्या विशेष विमानाची मदत जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे टँकर वायुदलाच्या महाकाय विमानाने रवाना झाले. येताना सर्व टँकर रेल्वेने पोहोचणार आहेत.

सामाजिक दायित्व निधीसाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना साकडे

कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची शासनाला आवश्यकता आहे. स्थानिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात यासाठी निधी उभारला जात असून, नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक उद्योजक-संस्थांना बुधवारी सामाजिक दायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व उद्योजक -व्यावसायिक संस्थांना रवाना करण्यात आले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, औषधसाठा व अन्य बाबींची पायाभूत सुविधा आणि खरेदी करावी लागत आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आगामी काळात या अत्यावश्यक सुविधा लागणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक संस्थांनी सढळ हस्ते जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Oxygen tanker to reach Vidarbha by Air Force aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.