मंत्री व आमदारांच्या पीएंना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या लॉबीमध्ये ‘मज्जाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:13 PM2017-12-11T20:13:02+5:302017-12-11T20:13:17+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील सभागृह लॉबीमध्ये मंत्री व आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) प्रवेश नाकारल्याने एकच खळबळ उडाली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील सभागृह लॉबीमध्ये मंत्री व आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) प्रवेश नाकारल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतप्त आमदारांनी या घटनेचा निषेध करून सरकार विरोधकांना बोलू देत नाही, आता पीएंनाही प्रवेश नाकारला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्री व आमदारांच्या पीएंसोबत, प्रतिनिधींसोबत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानुसार मंत्री व आमदारांच्या पीएंना सभागृहाच्या लॉबीमध्ये जाण्यास रोखण्यात आले. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लेखी आदेश जारी केले. यामुळे आमदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. आ. सत्तार म्हणाले, राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीच्या अधिकाराचे हनन करणारा आणि हुकूमशाहीचे संकेत देणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री व आमदारांचे पीए लॉबीमध्ये येतात. ते सरकारचा एक भाग आहे. मंत्री व आमदारांना ते मदत करण्यासाठी येत असतात. परंतु सरकारने बोलण्यावर निर्बंध टाकले आहे. हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे.
भाजपच्या काही आमदारांनी भाजपचे प्रतोद सुधाकर देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली. सुधाकर देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आमदारांच्या पीएंना प्रवेश नाकारण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.