पालनकर्ता काकाच ठरला भक्षक
By admin | Published: June 17, 2017 02:13 AM2017-06-17T02:13:59+5:302017-06-17T02:13:59+5:30
एका गर्भश्रीमंत कुटुंबाची ‘ती’ लाडकी छकुली होती. परंतु वर्षाचीही झाली नसेल तर आईवडीलांचा कार अपघातात गेले.
‘ती’ पुन्हा रस्त्यावर : बालकल्याण समितीने पाठविले अनाथालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका गर्भश्रीमंत कुटुंबाची ‘ती’ लाडकी छकुली होती. परंतु वर्षाचीही झाली नसेल तर आईवडीलांचा कार अपघातात गेले. गडगंज संपत्तीची ती एकटीची वारस असल्याने तिच्या काकाने पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली, आपल्या घरी घेऊन गेला. तिच्या आईवडिलांनी जमविलेल्या संपत्तीची धुळधाण केली आणि मुलगी १४ वर्षांची होताच तिच्यावर अतिप्रसंग करायला लागला. हे पाप उघडकीस येताच तिला नागपुरात सोडून पळून गेला. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या विविश मुलीला अखेर बालकल्याण समितीने अनाथालयात दाखल केले. ही मुलगी तिच्या नराधम काकाकडे पुण्यात रहात होती.
बुधवारी रात्री १ च्या सुमारास ही मुलगी मानकापूर पोलिसांना दिसली. पोटात अन्नाचा कण नसल्याने ती चक्कर येऊन पडली. पोलिसांनी तिला मेयो रुग्णालयात दाखल केले. याची सूचना जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याला देण्यात आली.
संरक्षण अधिकारी साधना हटवार, जिल्हा बाल कल्याण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी मेयो रुग्णालय गाठले. सहा तासानंतर मुलीला शुद्ध आली. तिने काकाकडून झालेल्या अत्याचाराची आपबिती संरक्षण अधिकारी साधना हटवार यांना सांगितली. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी तिला बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिला शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आले. तिच्याशी अतिप्रसंग करणाऱ्या काकाच्या विरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी काकावर पास्को व बाल संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मुश्ताक पठाण यांनी दिली.