सचोटी आणि समर्पणाचे पाईक ‘मुंबईचा डबेवाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:18 AM2017-09-22T01:18:29+5:302017-09-22T01:18:43+5:30
वेळेचे उत्तम नियोजन करीत, कामाबाबत असलेली सचोटी आणि समर्पणाची भावना ठेवत, १२७ वर्षांपासून निरंतर व अचूक काम करीत मुंबईतील डबेवाले ग्राहकांचे समाधान करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेळेचे उत्तम नियोजन करीत, कामाबाबत असलेली सचोटी आणि समर्पणाची भावना ठेवत, १२७ वर्षांपासून निरंतर व अचूक काम करीत मुंबईतील डबेवाले ग्राहकांचे समाधान करीत आहेत. मुंबईतील डबेवाल्यांचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रात्याक्षिक उदाहरण आहे. त्यामुळेच मुंबईच्या डबेवाल्यांना सातासमुद्रापार मान मिळाला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनचे सीईओ व आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल यांनी गुरुवारी चिटणवीस सेंटरमध्ये विद्यार्थ्यांपुढे डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचा उलगडा केला.
कोशीश फाऊंडेशन व एनआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झिरो टू हिरो’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात वक्ता म्हणून डॉ. अग्रवाल बोलत होते. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, आरती देशमुख, मुंबई डबेवाला असोसिएशनचे संचालक गोरखनाथ पोळ मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ. अग्रवाल यांनी मुंबईचे डबेवाले कित्येक वर्षांपासून ग्राहकांना त्यांचा टिफीन वेळेत पोहोचविण्याचे काम कसे करतात, याची माहिती दिली. त्यांच्या या कामामुळे अल्पशिक्षित असूनही त्यांना ‘लॉजिस्टिक्स-सप्लाय चेन मास्टर्स’ म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या अचूक कामामुळे सिक्स सिग्मा हे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कुठल्याही अर्जाशिवाय डब्बेवाल्यांच्या कामाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. ही ख्याती मिळविण्यासाठी डब्बेवाला रोज नऊ तास परिश्रम करतो. तो कामाला पूजा आणि ग्राहकांना देव मानतो. तो आपल्या कामात इतका प्रामाणिक आहे की ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता, मुंबईच्या लोकलमधून मार्ग काढत ग्राहकाला वेळेत डबा पोहोचवितो. मुंबईतील पाच हजार डब्बेवाल्यांमुळे दोन लाख लोकांना वेळेत घरचे आणि ताजे अन्न खायला मिळत आहे. आज महाविद्यालयात शिकणाºया विद्यार्थ्यांनी मुंबईच्या या डब्बेवाल्याकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्यातील समर्पण आणि सचोटी हे गुण अंगिकारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास, ते सुद्धा आपली विशेष ओळख निर्माण करू शकतात.
या कार्यक्रमात अग्रवाल यांनी विद्यार्थी व अतिथींनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता फुलसुंगे यांनी केले.
संचालन श्रद्धा यांनी तर आभार कोशीश फाऊंडेशनचे अध्यक्ष सलील देशमुख यांनी मानले.
मी पण खाल्ला डबेवाल्यांचा डबा - दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा म्हणाले की, विद्यार्थी जीवनात मी अंधेरी येथे शिक्षण घेत असताना, डबेवालेच मलाही डबा पोहचवित होते. मी सुद्धा डबा खाल्ला आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीची जाणीव मला चांगलीच आहे. ते कुठल्याही आपत्तीत थांबत नाही. आपल्या कर्तव्यावर असताना एका डबेवाल्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याने आपले कर्तव्य यशस्वीरीत्या पार पाडले. हे उदाहरण त्याच्या कामाबद्दल असलेल्या प्रामाणिकतेचे आहे. त्यांनी डॉ. पवन अग्रवाल यांची देखील प्रशंसा करीत डबेवाल्यांच्या जीवनाशी जुळलेल्या विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करून देण्याचे आवाहन केले.
पॅकेजच्या मागे धावू नका
डॉ. पवन अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या रकमेच्या पॅकेजच्या मागे धावण्यापेक्षा जे काम मिळाले आहे, ते प्रामाणिकपणे करा. त्यामुळे त्यांची संस्थेतच प्रगती होईल आणि पुढे चांगल्या पॅकेजच्या आॅफर्स येतील. स्वत:ची दुसºयाशी तुलना करण्यापेक्षा आपले काम सचोटीने केल्यास यश नक्कीच मिळेल.