पद्मश्री हंसराज हंस यांच्या सुफियाना लोकसंगीताने नागपूरकर झाले दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:35 PM2019-12-02T23:35:41+5:302019-12-02T23:40:53+5:30
सुविख्यात पंजाबी लोकगायक, सुफी गायक पद्मश्री खासदार हंसराज हंस सोमवारी नागपुरात दाखल झाले आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाला खऱ्या अर्थाने खासदारी रंग चढल्याची अनुभूती प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत जितका बहुभाषा, बहुसंस्कृतीने नटलेला तेवढ्याच बहुसांस्कृतिक आणि लोकपरंपरांनी समृद्ध झालेला देश. राज्यपरत्वे बदलत जाणारी वेशभूषा जसी मोहक तशीच संगीत परिभाषेची धाटणीही वेगळी. ग्लोबल युगात इतर गोष्टींप्रमाणे संगीताचेही आदानप्रदान झालेच आहे. मात्र, अभिजात संगीत ही हृदयीची भावना व्यक्त करते आणि ही भावना सहज या हृदयीचे त्या हृदयी वास करीत जाते. हा सगळा सार घेऊन सुविख्यात पंजाबी लोकगायक, सुफी गायक पद्मश्री खासदार हंसराज हंस सोमवारी नागपुरात दाखल झाले आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाला खऱ्या अर्थाने खासदारी रंग चढल्याची अनुभूती प्राप्त झाली.
खासदार महोत्सवाच्या आयोजनाचा विस्तार यंदा प्रथमच करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसºया महोत्सवातील विस्तारित आयोजन उत्तर नागपुरातील लाल गोदामच्या बाजूला असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर सोमवारी करण्यात आले होते. ‘हंसराज हंस लाईव्ह इन कॉन्सर्ट’साठी मोठ्या संख्येने मराठी बांधवांसोबतच मूळ पंजाबी मात्र येथेच स्थायिक झालेले पंजाबीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सुफी गायकीची महती व्यक्त करीत त्यांनी सुफियाना संगीताचे जनक अमीर खुसरौ यांना वंदन करीत कार्यक्रमास सुरुवात केली. ‘जिंदगी दी है तो जिने का हुनर भी देना’ या सुफी गीताने अगदी प्रारंभीच रुहानी मैफिलीचा आगाज झाला. बडे साहिब अर्थात सच्चे पातशाह गुरू नानक देवजी यांना ही गजल अर्पण होती. त्यानंतर, खास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूरकरांसाठी ‘उसे मिल गये दोनो जहाँ, जिसे तूने दर पे बुला लिया’ ही गजल सादर करीत गडकरींच्या नेतृत्वाचे गुणगौरव केले. केंद्र सरकारमधील पहिल्या क्रमांकाचे मंत्री म्हणून गडकरींचा गौरव करीत, त्यांच्या कामाची पावती बघण्यासाठी संपूर्ण देशाचा प्रवास करण्याचे आवाहन हंसराज हंस यांनी यावेळी केले. त्यानंतर सुफियाना अंदाजातील ‘सुनो महाराजा जगत के वाली’ हे गीत अशा काही तयारीने सादर केले की जणू संपूर्ण श्रोतृवृंद तल्लीन झाला होता.
त्यानंतर कच्छे धागे, बिच्छू, जोडी नंबर १, शहीद, नायक चित्रपटातील गाणी सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास बाध्य केले. यावेळी मस्तमौला पंजाबी मानसिकतेची अनुभूती झाली. सगळेच जण आपापल्या जागेवर भांगडा करण्यास सज्ज झाले.
काहींनी हंसराज हंस यांच्या पुढे येऊन नाचण्यास सुरुवात केली. हंस यांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद देत मस्तमौला गाणी सादर करीत सोमवारची रात्र रंगीन करून सोडली. यावेळी हंसराज हंस यांच्यासह त्यांना वाद्यांवर संगत करणाºया मोहम्मद युनूस, महेश कुमार, सादिक अली, सोहेल खान, गुरुनाम सिंग, कश्मीर मोहम्मद आणि कुलविंदर सिंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, आमदार अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, अनिल भारद्वाज, नवनीतसिंग तुली, परविंदर सिंग, हरदेव सिंग बाजवा उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.
नितीन गडकरी यांनी दिला व्हिडीओ संदेश
हिवाळी अधिवेशनाचे संसदेचे उशिरापर्यंत चाललेले सत्र आणि नंतर लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच असलेल्या विशेष बैठकीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कॉन्सर्टला हजर राहू शकले नाही. त्यांनी आपला संदेश व्हिडीओमार्फत पाठविला आणि नागपूरकर व हंसराज हंस यांचे आभार मानले. हंसराज हंस यांनी सत्काराला उत्तर देताना, गडकरी यांची उणीव भासत असल्याची भावना व्यक्त केली. ज्यांना मानतो त्यात गडकरी यांचा समावेश असल्याचे ते यावेळी म्हणाले.
ये नागपूर के लोग है, बडे शौकीन है
गायनादरम्यान त्यांनी नागपूरकरांच्या वैशिष्ट्याबद्दल भावना व्यक्त केल्या. नागपूरकर जीवनशैलीशी अनुसरून ‘ये नागपूर के लोग है, बडे शौकीन है’ असे काही जणांनी सांगितले होते. त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेत असल्याचे हंसराज हंस म्हणाले.