नागपुरात  मनपा शाळेतील मुलींसाठी ‘ते’ ठरले ‘पॅडमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 08:42 PM2018-02-23T20:42:20+5:302018-02-23T20:42:38+5:30

महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या  बहुतेक मुली या गरीब कुटुंबातून आलेल्या असतात. त्यांच्या संवेदनेची जाणीव असलेल्या डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मनपाच्या विवेकानंदनगर माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन दोन वर्षापूर्वी भेट दिली. विशेष म्हणजे तेव्हापासून ते शाळेला सातत्याने सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा देखील करीत आहेत. त्या शाळेतील गरीब मुलींसाठी ते खऱ्या  अर्थाने ‘पॅडमॅन’ ठरले आहेत.

Padman to be 'the' for girls in Nagpur NMCschool |  नागपुरात  मनपा शाळेतील मुलींसाठी ‘ते’ ठरले ‘पॅडमॅन’

 नागपुरात  मनपा शाळेतील मुलींसाठी ‘ते’ ठरले ‘पॅडमॅन’

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वीच लावली पॅड वेन्डींग मशीन : शिक्षकांचेही पाठबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याशी निगडित गंभीर व महत्त्वाचा विषय असूनही आतापर्यंत तो झाकल्या मुठीत राहिला होता. आता कुठे याबाबत जागरूकता येत आहे. असे असले तरी त्यात व्यापकता येणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात गरीब कुटुंबातील महिलांना अवहेलनेची झळ आजही सोसावी लागते. शाळकरी मुलींनाही हा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या  बहुतेक मुली या गरीब कुटुंबातून आलेल्या असतात. त्यांच्या संवेदनेची जाणीव असलेल्या डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मनपाच्या विवेकानंदनगर माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन दोन वर्षापूर्वी भेट दिली. विशेष म्हणजे तेव्हापासून ते शाळेला सातत्याने सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा देखील करीत आहेत. त्या शाळेतील गरीब मुलींसाठी ते खऱ्या  अर्थाने ‘पॅडमॅन’ ठरले आहेत.
प्रत्येक वाढदिवसाला मनपाच्या शाळेत काही ना काही देणे हा डॉ. शेंबेकरांचा नित्यक्रम. त्यांनी संगणक, पिण्याच्या पाण्याची मशीन शाळेला दिली होती. मनपाच्या शाळांमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना शाळेतील आठवी ते दहावीच्या मुलींना त्या दिवसांमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. विवेकानंदनगरच्या शाळेत असेच आरोग्य शिक्षण देत असताना या शाळेला सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन देण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी त्यांनी ती मशीन शाळेला भेट दिली. गरीब मुलींना अत्यल्प किमतीत सहजपणे पॅड घेता यावे व त्यांना सुटी घेऊन घरी जाण्याची व अभ्यास बुडण्याची वेळ येऊ नये हा त्यांचा उद्देश. त्यानुसार त्यांनी काही डॉक्टरांच्या मदतीने सॅनिटरी नॅपकीन कसे वापरावे, त्याची आवश्यकता आणि पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले. नुसती मशीन लावून चालणार नाही, ही बाब त्यांना समजली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते सॅनिटरी नॅपकीनचा सातत्याने पुरवठा करीत आहेत. शाळेतील शिक्षकांकडूनही यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याने एक मोठे परिवर्तन शाळेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुलीही याबाबत जागृत झाल्या आहेत.
पॅडमॅन हा चित्रपट सध्या चांगला चर्चेत असून यामुळे महिलांच्या त्रासाबाबत सामाजिक जाणीव निर्माण केली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. शेंबेकर यांनी आधीपासूनच जागृतीची भूमिका स्वीकारली आहे.
विद्यार्थिनींनी केले स्वागत
सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन या शाळेतील मुलींसाठी वरदान ठरली आहे. लोकमतजवळ आपली भावना व्यक्त करताना काही मुलींनी सांगितले, यापूर्वी आम्हाला कपडा वापरावा लागत होता व त्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. त्या दिवसात सुटी घेऊन घरी जावे लागत होते. कधी कधी शिक्षक आम्हाला बाहेरून नॅपकीन आणून द्यायचे. मात्र अडचण सांगताना आम्हाला ओशाळल्यासारखं वाटायचं. ही मशीन लागल्याने आम्हाला खूप मदत मिळाली. पैसे नसले की शिक्षकच आम्हाला मदत करतात. अत्यल्प दरात मिळत आहेत, त्यामुळे येथील नॅपकीन आम्ही आमच्या कुटुंबातील महिलांनाही देतो. आम्हालाही अभ्यास बुडवून घरी जाण्याची वेळ येत नसल्याचे आठवी, नववीच्या मुलींनी सांगितले.
आरोग्य शिक्षणासाठी शाळेचे पाऊल
नुसती मशीन लावली तरी काही होणार नाही, याबाबत विद्यार्थिनींमध्ये जागृती होणे आवश्यक होते. यासाठी शाळेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शिक्षिका सुषमा फुलारी-मानकर यांनी सांगितले, शाळेत विद्यार्थिनींना त्या काळात घेण्याची काळजी, अंतर्वस्त्रांचा योग्य वापर, स्वच्छता याचे मार्गदर्शन केले जाते. केवळ मासिक पाळीचाच विषय नाही तर लैंगिक शिक्षणाबाबत शाळेतर्फे दर आठवड्यात क्लास घेउन मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी शाळेतर्फे त्यांच्यासह अर्चना बालेकर, संध्या भगत, नीता गडेकर, ज्योत्स्ना कट्यारमल या शिक्षकांची टीम तयार केली आहे. केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही मार्गदर्शन केले जाते. वयात आलेल्या मुलामुलींमध्ये कसे बदल होतात, त्यावेळी कशी काळजी घ्यावी अशा अनेक प्रश्नांबाबत डॉक्टर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांच्याकडून नियमित मार्गदर्शन वर्ग चालविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. वयात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल निर्माण होते व चुकीच्या गोष्टींमुळे त्याचे दुष्परिणात भोगावे लागतात. हे होऊ नये हा आमचा प्रयत्न असल्याचे सुषमा मानकर यांनी सांगितले.

Web Title: Padman to be 'the' for girls in Nagpur NMCschool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.