‘पद्मावत’चा वाद, नागपूरच्या मॉल्समध्ये तगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:07 PM2018-01-24T23:07:13+5:302018-01-24T23:08:39+5:30
पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. परंतु राजपूत करणी सेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत आपला विरोध दर्शविला. मॉलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे ज्या मॉलमध्ये हा चित्रपट लागला आहे, त्याला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे.
सीताबर्डी येथील इटर्निटी मॉलसमोर बुधवारी श्री राजपूत करणी सेनाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रमोदसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्याच्या उद्देशाने मॉलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना पकडून अंबाझरी पोलीस ठाण्यात नेले. तसेच गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस सिटी मॉल येथे अगोदरच पोलिसांनी बंदोबस्त केला होता. असे असतानाही चित्रपटाला विरोध करणारे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी नारेबाजी केली. पोलिसांच्या माहितीनुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. प्रमोदसिंह ठाकूर यांच्यासह पवन सिंह, गणेश नामदेव सिंह, पंकज परमार, शत्रुघ्न सिंह आदी कार्यकर्त्यांचा निदर्शनकर्त्यांमध्ये समावेश होता.