पाडवा भोवला; १०० हून अधिक बसेस उभ्या: कंडक्टर व चालकांची सामूहिक दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:05 AM2019-09-01T00:05:40+5:302019-09-01T00:07:42+5:30
पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या. शहरातील अनेक मार्गावरील बसफेऱ्या बंद होत्या. यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
आपली बसच्या ताफ्यात ३३७ मोठ्या रेड बसेस व ४२ मनी बसेस आहेत. परंतु यातील दररोज जवळपास ३६० बसेस धावतात तीन ऑपरेटरच्या माध्यमातून या बसेस चालविल्या जातात. बस कंडकटर व चालक उपलब्ध करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिगे्रटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टीम (डीआयएमटीएस) कंपनीकडे आहे. १५०० हून अधिक कंडक्टर व चालक आहेत. असे असतानाही शुक्रवारी कंडक्टर व चालक नसल्याने ४५ बसेस धावल्या नाही, तर शनिवारी जवळपास ११० बसेस उभ्या होत्या. यात मोठ्या बस सोबतच मिनी बसचाही समावेश होता. यामुळे सीताबर्डीहून पारडी, हिंगणा, गोधनी, बुटीबोरी, बहादुरा, डिफेन्स, वाडी व न्यू नरसाळा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या कमी होती. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले.
गेल्या दोन वर्षात कंडक्टर व चालक नसल्याने अचानक बसेस बंद राहिल्याने महापालिकेला जवळपास सात कोटींचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार दांडी मारूनही संबंधित कंडक्टरवर कारवाई होत नाही. संबंधित कंत्राटदारालाही जाब विचारला जात नसल्याने हा प्रकार सुरू आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.