जिल्हा सीमा नाक्यावर पाेलीस बंदाेबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:34+5:302021-04-25T04:08:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘ब्रेक द चेन’ माेहीम राबविली जात आहे. आठवडाभरापासून संपूर्ण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘ब्रेक द चेन’ माेहीम राबविली जात आहे. आठवडाभरापासून संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासावर कडक निर्बंध लावले आहेत. याअंतर्गत जिल्हा सीमा नाक्यावर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला असून, प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. शनिवारी (दि. २४) ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्यासह पाेलीस, महसूल व आराेग्य कर्मचारी सज्ज हाेते.
भिवापूर शहर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असून, काही अंतरावरच भंडारा, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमांना प्रारंभ हाेतो, शिवाय शहरातून जाणारा नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग पुढे आंध्र प्रदेश, छत्तीसगढ व मध्य प्रदेश राज्याला मिळतो. त्यामुळे या मार्गाने परराज्यांसह इतर जिल्ह्यांतून खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. गतवर्षीचा अनुभव पाहता प्रवासी वाहनांतून संसर्गाचा धाेका असल्याने शासनाने राज्य व जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीवर यावेळी पुन्हा काही निर्बंध घातले आहे.
जीवनावश्यक व अत्यावश्यक प्रवासासाठी ई-पासची सुविधा शनिवार (दि. २४) पासून अंमलात आणली गेली. याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आंतरराज्य व जिल्हा सीमेवर प्रवाशांच्या तपासणीसाठी नाकाबंदी केली आहे. भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालय परिसरात हा तपासणी नाका उभारला आहे. याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूल, आरोग्य विभागातील प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांच्या सहभागातील तीन पथके तैनात केली आहेत. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळपासून आवागमन करणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली.
....
४०० वर प्रवाशांची तपासणी
स्थानिक राष्ट्रीय विद्यालय परिसरात सज्ज करण्यात आलेल्या जिल्हा सीमा नाक्यावर गुरुवारी (दि. २२) सुमारे ३०० प्रवासी वाहनांची तपासणी केली गेली. त्यानंतर शनिवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात महसूल, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने दिवसभरात शंभरावर प्रवाशांची तपासणी केली. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.
...
लक्षणे आढल्यास थेट कोविड सेंटरमध्ये दाखल
सीमाबंदी नाक्यावर परराज्य व बाहेरील जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. या तपासणीदरम्यान काेविडची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, शिवाय लक्षणे नसलेल्या प्रवाशांच्या हातावर ‘१४ दिवस क्वारंटाईन’ असा शिक्का मारण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहे. तैनात पथकातील कर्मचारी गैरहजर राहिल्यास साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.