कामठी शहरात पाेलिसांचे ‘माॅक ड्रील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:22+5:302021-07-17T04:08:22+5:30
कामठी : सण व उत्सवाच्या काळात अनुचित घटना न घडता कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ...
कामठी : सण व उत्सवाच्या काळात अनुचित घटना न घडता कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी कामठी शहरातील भाजीमंडी परिसरात ‘माॅक ड्रील’ केले. यावेळी आंदाेलन, दंगल, जाळपाेळ व त्यावर नियंत्रण याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा शहरातील भाजीमंडी परिसर संवेदनशील आहे. त्यामुळे हाच परिसर ‘माॅक ड्रील’साठी निवडण्यात आला. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली हाेती. या ‘माॅक ड्रील’मध्ये तणावपूर्ण वातावरण, त्यातून रस्त्यावर केली जाणारी जाळपाेळ, नारेबाजी, याची पाेलिसांना मिळणारी माहिती, पाेलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल हाेणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दंगा नियंत्रण पथक व अतिरिक्त पाेलीस कुमक मागवणे, अग्निशमन दलाची मदत घेणे, आंदाेलन व नागरिकांशी संवाद साधून त्यांना शांत करणे, प्रसंगी गर्दी पांगवण्यासाठी साैम्य व तीव्र लाठीमार करणे, दाेषींना ताब्यात घेणे यासह अन्य बाबींची प्रात्यक्षिके करण्यात आली. या संपूर्ण ‘माॅक ड्रील’चे चित्रिकरण करण्यात आले. एसीपी राजीव पंडित, राहुल शिरे, विजय मालचे, विश्वनाथ चव्हाण आदी ठाणेदारांसह कामठी (जुनी), कामठी (नवीन), पारडी, कळमना पाेलीस ठाण्यातील पाेलीस अधिकारी व कर्मचारी या ‘माॅक ड्रील’मध्ये सहभागी झाले हाेते.