लोकसभेसाठी भाजप नेमणार पेज प्रमुख
By admin | Published: July 10, 2017 01:36 AM2017-07-10T01:36:35+5:302017-07-10T01:36:35+5:30
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी ‘मायक्रो लेव्हल’ नियोजन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
‘मायक्रो लेव्हल’ नियोजन : बूथ विस्तारक योजना यशस्वितेचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी ‘मायक्रो लेव्हल’ नियोजन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मतदार यादीतील एका पेजवर असलेल्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी ‘पेज प्रमुख’ नियुक्त केले जाणार आहेत.
भाजपाच्या कोअर कमिंटीची रविवारी धंतोली येथील विभागीय कार्यालयात बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, प्रदेश संघटन मंत्री रवि भुसारी, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी आदी उपस्थित होते. या वेळी कोहळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पेज प्रमुखांची यादी तयार झाल्याचे सांगत लवकरच त्यांची घोषणा केली जाईल, असे सांगितले. याशिवाय मतदार नोंदणीसाठी बीएलओच्या नावांची घोषणा येत्या शुक्रवारी केली जाईल. यामुळे पक्षातर्फे नव्या मतदारांची नोंदणी करण्याला गती येईल, असेही स्पष्ट केले. शहरातील सर्व १९१४ बूथवर विस्तारक योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी पंडित दीनदयाल जन्मशताब्दी निमित्त मंडळ अध्यक्षांकडून विस्तारक योजनेची माहिती घेतली. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, राजेश बागडी, भोजराज डुम्बे, किशोर पलांदूरकर, अर्चना डेहनकर, प्रमोद पेंडके, बंडू राऊत, दिलीप गौर, गुड्डू त्रिवेदी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, चंदन गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जनहिताचे कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जनहिताचे कार्यक्रम राबविण्याची योजना भाजपाने आखली आहे. या अंतर्गत रोगनिदान शिबिरे, कल्याणकारी योजनांची माहिती देणारे शिबिर आदी आयोजित केले जाणार आहेत.