वृद्ध, जखमी श्वानांच्या वेदना सरकारच्या कानावरच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 09:31 PM2021-01-19T21:31:22+5:302021-01-19T21:33:22+5:30

Nagpur news प्रामाणिक प्राणी कोणता, असा प्रश्न विचारताच एकच नाव ओठावर येते, ते म्हणजे कुत्रा ! कुटुंबाचा सदस्य होऊन सेवा बजावणाऱ्या या प्राण्याचा वृद्धापकाळ मात्र बऱ्याचदा कष्टदायक असतो.

The pain of old, injured dogs is not heard by the government | वृद्ध, जखमी श्वानांच्या वेदना सरकारच्या कानावरच नाहीत

वृद्ध, जखमी श्वानांच्या वेदना सरकारच्या कानावरच नाहीत

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कुठेच नाही शेल्टरखासगी सेवाभावी संस्था जोपासताहेत भूतदयेचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रामाणिक प्राणी कोणता, असा प्रश्न विचारताच एकच नाव ओठावर येते, ते म्हणजे कुत्रा ! कुटुंबाचा सदस्य होऊन सेवा बजावणाऱ्या या प्राण्याचा वृद्धापकाळ मात्र बऱ्याचदा कष्टदायक असतो. मालक काळजीवाहू आणि संवेदनशील असला तर ठीक, अन्यथा आयुष्याच्या अखेरच्या दिवसात सेवा देण्यात सक्षम नसल्यावर हा प्रामाणिक जीव मात्र निराधार होतो. अशी अनेक कुत्री आज कष्टात जगत असली तरी त्यांच्या वृद्धापकाळातील वेदना अद्यापतरी सरकार किंवा श्वानप्रेमींनी ऐकलेल्या दिसत नाहीत.

नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या ८० हजार तर पाळीव कुत्र्यांची संख्या ३५ हजार आहे. मात्र शासनाच्या वतीने चालविले जाणारे डॉग शेल्टर कुठेच नाही. शासनाची प्राणी क्लेश निवारण समिती अस्तित्वात असून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात. मात्र तक्रार आल्यावर निराकरण करण्यापलीकडे या समितीचे फारसे काम दिसत नाही. केंद्राच्या अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या माध्यमातून वृद्ध आणि विकलांग कुत्र्यांच्या संगोपनासाठी प्रस्ताव दाखल करून रुग्णालय आणि शेल्टर हाऊस उभारले जाऊ शकते. मात्र अद्याप तरी असा प्रस्ताव प्रशासनाकडून गेलेला नाही. नागपूर महापालिकेने २०१२ मध्ये भांडेवाडी येथे जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी अ‍ॅनिमल सेंटरची स्थापना केली. येथे दोन डॉक्टरांची नियुक्ती असून अपघातामध्ये जखमी झालेले कुत्रे, डुकरे आणि मांजरींची शुश्रूषा केली जाते. उपचारानंतर सोडले जाते. येथे ३० ते ३५ कुत्र्यांना दाखल करून घेण्याची क्षमता आहे. मात्र वृद्ध, विकलांग कुत्र्यांना कायमस्वरूपी ठेवण्याची व्यवस्था नाही.

पशू क्रूरता निवारण समितीच्या वतीने गिट्टीखदान परिसरात डॉग सेल्टर आहे. सुरेंद्र अरोरा हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सहसचिव तरुण मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे वृद्ध आणि विकलांग कुत्र्यांना कायमस्वरूपी ठेवण्याची व्यवस्था आहे. अशा कुत्र्यांच्या अन्नासाठी व संगोपनासाठी त्यांच्या मालकांकडून देखभाल खर्च घेऊन आयुष्यभर शुश्रूषा केली जाते. येथे सध्या ३४ वृद्ध कुत्री असून १० पिले आहेत. ॲनिमल वेलफेअर बोर्डाने या संस्थेला निधीही दिला आहे. या सोबतच स्मिता मिरे यांच्यामार्फतही शहरात बेवारस व जखमी कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस चालिवले जाते. प्रस्ताव तयार महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांवर उपचारासाठी आणि सेल्टर होम उभारण्यासाठी मनपाने १२ ते १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. अद्याप तो सादर झालेला नाही.

सध्याचे भांडेवाडीतील रुग्णालय तात्पुरते असून, त्याचा खर्च महानगरपालिकेच्या वतीने चालविला जात आहे. मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र, कोरोनामुळे विषय पुढे सरकला नाही. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप असा प्रस्ताव गेलेला नाही. मात्र, प्रयत्न सुरू आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल.

- रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा प्राणी क्लेश निवारण समिती, नागपूर

नागपुरात एसपीसीए (सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूव्हेल्टी ॲनिमल्स) स्थापन करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे. धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. शासनाकडून फंड आल्यावर व जागा मिळाल्यावर सेल्टर उभारणीच्या दृष्टीने काम सुरू होईल. -

डॉ. मंजूषा पुंडलिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सचिव, जिल्हा प्राणी क्लेश निवारण समिती, नागपूर ...

Web Title: The pain of old, injured dogs is not heard by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा