रंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील उडाले रंग; टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:53 AM2021-03-18T10:53:30+5:302021-03-18T10:53:52+5:30
Nagpur News कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २८ मार्चला होलिका दहन आणि २९ मार्चला धुळवड आहे. कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे. गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांचे रंग-गुलाल, पिचकारी, मुखवटे, पोंगे आदी पडलेले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेले आहेत. साठवणूकदरांचा किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क होत नाही. खरेदी केल्यानंतर गुंतवणूक तरी निघेल का, हा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहे. अशा संभ्रमावस्थेमुळे सर्वच बेजार झाले आहेत.
२१ मार्चनंतर टाळेबंदी आणखी वाढली तरी ठोक व्यापाऱ्यांचा तोटा निश्चित आहे. डिसेंबरपर्यंत कोरोना नियंत्रणाची शक्यता वाढल्यामुळे, अन्य जिल्ह्यांतून रंग व गुलालाची सामग्री मागवण्यात आली होती. परंतु, ऐन उत्सवाच्या काळात पुन्हा टाळेबंदी झाली आणि व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. २२ मार्चनंतर टाळेबंदी संपेल आणि बाजारपेठा उघडल्यावर किमान गुंतवणूक तरी निघेल, अशी अपेक्षा व्यापारी करत आहेत.
रंगांचे ठोक व्यापारी श्वेतांग खोब्रागडे यांनी सांगितल्यानुसार, कोरोना संक्रमणामुळे व्यापारातील व्यवहारात परिवर्तन आले आहे. सामग्रीसाठी ॲडव्हान्स देणे गरजेचे असते. दिवाळीनंतर होळीची तयारी सुरू होत असते. रंगांचे निर्माण आणि व्यवसाय सुरू होतो. डिसेंबरपासून ठोक व्यापाऱ्यांनी सोलापूर आदी ठिकाणांहून रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे आदी मागवण्यास सुरुवात केली होती. त्याचे पेमेंटही दिले गेले आहे. आता व्यापारच बंद पडल्याने लागत काढणेही कठीण झाले आहे.
दुसऱ्या जिल्ह्यांतून व्यापारी येण्यास कचरत आहेत
नागपुरात स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच नजीकच्या जिल्ह्यांतून किरकोळ व्यापारी रंग आणि अन्य सामग्री घेण्यास येत असतात. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कठोर निर्देश दिले असल्याने, अन्य राज्यांतील व्यापारीही नागपुरात पोहोचत नाहीत. स्थानिक किरकोळ व्यापारीही टाळेबंदी संपण्याची वाट बघत आहेत.
१० टक्क्यांचीसुद्धा विक्री नाही
होळीपूर्वी दोन महिने आधी रंगांचा व्यापार सुरू होत असतो. किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असतात. दोन आठवड्यापूर्वी खरेदी-विक्रीला गती प्राप्त होते. पंरतु, कोरोनामुळे यंदा दहा टक्केही व्यवहार झालेले नाहीत. ९० टक्के सामग्री ठोक व्यापाऱ्यांकडेच पडून आहे.
.............