नागपुरात चित्रात रंगले संगीताचे सूर; बासरी, व्हायोलिन व पेंटिंगची जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:26 AM2018-02-06T11:26:51+5:302018-02-06T11:27:11+5:30
बासरी, व्हायोलिन व तबला याच्या स्वरांसह रंगलेला हा अनोखा कलाविष्कार सध्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन येथे अनुभवायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बासरी, व्हायोलिनवर एखादे आवडीचे संगीत ऐकताना एक सहज आनंदाची भावना मनात निर्माण होते. या सहज विचारांना अभिव्यक्तीचे अनेक कंगोरे असतात. अभिव्यक्तीचा हा प्रवाह कॅनव्हासवर उतरविण्याचा प्रयत्न आर्टफ्लोज आर्टिस्ट ग्रुपच्या सात कलावंतांनी केला आहे. बासरी, व्हायोलिन व तबला याच्या स्वरांसह रंगलेला हा अनोखा कलाविष्कार सध्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन येथे अनुभवायला मिळत आहे.
आर्टफ्लोज आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे कलाप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘फ्लोईजम-३’ या शीर्षकाखाली चित्रात संगीताचा प्रवाह दर्शविणारे हे प्रदर्शन सुरांच्या लहरीने अधिकच विलोभनीय ठरले आहे. ग्रुपचे संस्थापक समीर देशमुख, सहसंस्थापक संजय मालधुरे, चित्रकार प्राची खोकले, आदिती गोडबोले, अनघा शेंडे, सुमेधा श्रीरामे व शीतल नगराळे या सात कलावंतांनी साकार केलेली पेंटिंग यामध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये बासरीवादक पं. प्रमोद देशमुख, व्हायोलिनवादक निशिकांत देशमुख यांच्या स्वरलहरीने प्रदर्शनात आणखी रंगत आणली आहे.
यातही तबलावादक आशिष पालवेकर व स्वरमंडळावर जयंत तरवटकर यांची सहसंगत अधिक मनमोहक ठरणारी आहे. पेंटिंग व संगीताची ही जुगलबंदी रसिकांनाही आकर्षण ठरली.
पं. प्रमोद देशमुख व निशिकांत देशमुख यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे सोमवारी उद््घाटन करण्यात आले. उद््घाटन कार्यक्रमाचे संचालन ग्रुपच्या चित्रकार सुमेधा श्रीरामे यांनी केले. एकाग्रता आणि सौंदर्य दर्शविणारी प्राची खोकले यांची चित्रे प्रेक्षणीय अशी आहेत.
निसर्ग व मानवाची प्रवृत्ती आणि प्रकृती दर्शविणारी आदिती गोडबोले यांची चित्रे प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाची केंद्र ठरली आहेत. संजय मालधुरे यांनी वॉटरकलरवर साकारलेली चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर कलावंतांनीही त्यांच्यातील भावना कौशल्यपूर्ण पद्धतीने साकार केल्या आहेत.
७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० पासून हे प्रदर्शन दर्शकांसाठी खुले असून एकदा आस्वाद घ्यावा अशी ही कलाकृती कलाप्रेमींना नक्कीच आपलसं करणारी आहे.