पेंटरला सात वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: May 3, 2017 02:32 AM2017-05-03T02:32:02+5:302017-05-03T02:32:02+5:30
एका २५ वर्षीय मजूर महिलेवरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने
सत्र न्यायालय : मजूर महिलेवरील अत्याचार प्रकरण
नागपूर : एका २५ वर्षीय मजूर महिलेवरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने एका आरोपी पेंटरला सात वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
राहुल गौतम जगताप (३२) असे आरोपीचे नाव असून, तो हुडकेश्वर रोड सेंट पॉल शाळेजवळील श्यामनगर येथील रहिवासी आहे. अत्याचाराची ही दुर्दैवी घटना १२ डिसेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी बेसा येथे ‘व्यंकटेश सिटी हेरिटेज सी’नावाच्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते.
या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर पीडित महिला साफसफाईचे काम करीत होती. या ठिकाणी पेंटर राहुल जगताप हा आला होता. त्याने या महिलेला गुंगीचे औषध असलेला खर्रा खाण्यास दिला होता. खर्रा खाताच पीडित महिलेला गुंगी येऊन ती बेशुद्ध झाली होती. त्याबाबतचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित महिलेवर अत्याचार केला होता. ती शुद्धीवर येताच तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ३७६, ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाडगे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांसह न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, भादंविच्या ३२८ कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.
न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपक कोल्हे तर आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत कावळे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल मुकुंदा जयस्वाल, रविकिरण भास्करवार, नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)