नागपूर HSC 2018; पेंटरच्या मुलीचे सप्तरंगी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:01 AM2018-05-31T11:01:16+5:302018-05-31T11:01:28+5:30
कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडील लोकांच्या घराच्या भिंती रंगविणारे हातमजूर; मात्र स्वत:चे राहायला घरही नाही. मामाच्या आधाराने ‘वन रूम वन किचन’मध्ये राहणारे हे कुटुंब. घरी अभ्यासाला बसायलाही पुरेशी जागा नाही. गरिबीत असल्याने काय करावे, असा संभ्रम व भीतीही वाटायची, पण अपार कष्ट करण्याची तयारीही होती. रात्री सर्व झोपले की किचनमध्ये जाऊन अभ्यास करायचा. या कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले.
गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलींना गुणवत्तेचा मार्ग दाखविणाऱ्या मंगळवारी बाजार, सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठात शिकणाºया संजनाची ही यशोगाथा थक्क करणारीच आहे. परिस्थिती वाईट असली की स्वप्न कोमेजली जातात. तिला मात्र स्वप्न टवटवीत ठेवायचे होते. गरीब व सामान्य घरातील मुलांप्रमाणे करिअरबाबतचा संभ्रम तिच्याही मनात होता. दहावीत चांगले गुण मिळाल्यानंतर काय करावे, हा प्रश्न तिच्यासमोरही होताच. कुठले ध्येय बाळगावे, असे सांगणारा मार्गदर्शकही नव्हता. तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. एक गोष्ट तिने कटाक्षाने पाळली, ती म्हणजे अभ्यासासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी. काय करायचे हा विचार करीत बसण्यापेक्षा जे करीत आहोत त्यात मनापासून मेहनत घ्यावी, हेच तिला ठाउक. मिळेल तेव्हा आणि जमेल तसे दररोज पाच ते सहा तास अभ्यास करण्याचे वेळापत्रकच तिने बनविले. बारावीच्या परीक्षेत या मेहनतीचे फळही तिला मिळाले.
आपल्याला यश मिळेल हा विश्वास होता. यामध्ये मामा आणि मामीने आर्थिक आणि मानसिक आधार दिल्याचे संजनाने लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्यामुळेच आधी नसलेले जीवनाचे ध्येय आता स्पष्ट दिसायला लागल्याची भावना तिने व्यक्त केली. शाळेच्या शिक्षकांनी केलेल्या सहकार्याचे आभार मानायलाही ती विसरली नाही.