पकड मोरी बय्या करत बरजोरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:40 AM2019-04-11T00:40:49+5:302019-04-11T00:41:38+5:30

संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली.

Pakad Mori Bayya karat barjori ... | पकड मोरी बय्या करत बरजोरी...

पकड मोरी बय्या करत बरजोरी...

Next
ठळक मुद्देपंडित प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोह : शिष्यांची गुरुला स्वरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली.
श्री संगीत विद्यालय, लक्ष्मीनगरतर्फे ‘सिद्धी’ या शिर्षकांतर्गत आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला पं. देशकर यांची शिष्या गीता गुलवाडी यांचे शास्त्रीय गायन व उत्तरार्धात नवोदित प्रतिभावान युवा कलाकार अथर्व भालेराव (व्हायोलिन), आदित्य गोगटे (बासरी), तरुण लाला (तबला), अनिकेत बारापात्रे (ड्रम्स), परिमल वाराणशीवार यांच्या रागसंगीताच्या जुगलबंदीने श्रोत्यांना अनोखा आनंद प्रदान केला. गीता गुलवाडी यांनी गुरुप्रति समर्पित गायनाने प्रथम स्वरांजली अर्पण केली. गुरुजनांच्या मार्गदर्शनासह किराणा, जयपूर-अत्रोली व ग्वाल्हेर घराण्याचे संमिश्र, सौंदर्यात्मक शैलीतील घरंदाज सादरीकरण त्यांनी केले. ‘राग मुलतानी’सह त्यांनी गायनाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिश ‘ऐसी लगन लगायो...’, मध्य तीन तालातील ‘पकड मोरी बय्या करत बरजोरी...’ व एकतालातील द्रुत तराणा यासह रागविस्तार झाला. रसिल्या अर्थभावाच्या बंदिशीचे भावपूर्ण सादरीकरण प्रसन्नतेने निनादले. यानंतर मिश्र खमाज रागातील ‘तुम राधे बनो हम शामबिहारी...’ या प्रासादिक बंदिशीसह ‘मेरो मन गुरुचरणन...’ या गुरुवंदनेने गायिकेने आपले गायन संपविले. त्यांना संदीप गुरमुळे (संवादिनी), नीलेश खोडे (तबला) व पल्लवी ठेंगे (तानपुरा) या कलावंतांनी साथसंगत केली.
कलाकार व श्रोता यांना शब्दांच्या पलिक डची सुखद अनुभूती प्रदान करणारी व दीर्घकाळपर्यंत नादावून टाकणाऱ्या विविध वाद्यांच्या खुमासदार अशा जुगलबंदीने या समारोहाला विशेष रंगत आणली. अथर्व भालेराव, आदित्य गोगटे, तरुण लाला, अनिकेत बारापात्रे व परिमल वाराणशीवार यांच्या परस्पर भिन्न अशा व्हायोलिन, बासरी, तबला, ड्रम्स व सिंथेसाईजर या वाद्यांचे सहज सुंदर व खुमासदार सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक भारतीय व पाश्चिमात्य वाद्यांचे हे श्रवणीय फ्युजन आनंद देणारे ठरले. या कार्यक्रमादरम्यान पं. देशकरांचे शिष्य अरविंद उपाध्ये यांना शेवाळकर संगीत महाविद्यालयातर्फे पं. देशकर स्मृती पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले. सहआयोजनक सप्तकचे डॉ. उदय यांनी प्रास्ताविक केले. आयोजनात अनुराधा हळवे-पाध्ये यांचा सहभाग होता.

Web Title: Pakad Mori Bayya karat barjori ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.