पाकिस्तान आण्विक हल्ल्याचा मूर्खपणा करणार नाही
By admin | Published: September 30, 2016 03:20 AM2016-09-30T03:20:17+5:302016-09-30T03:20:17+5:30
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.
माजी सैन्य अधिकाऱ्यांचे मत :
मानसिक युद्ध, फिदायीन हल्ल्यांवर राहील भर
नागपूर : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. जर दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु माजी सैन्य अधिकाऱ्यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. जर पाकिस्तानने आण्विक हल्ला केला तर प्रत्यक्षात भारतापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होईल. याची पाकिस्तान सैन्याला जाणीव आहे. त्यामुळे ते असे पाऊल उचलण्याचा मूर्खपणा करणार नाही, असे मत भारतीय सैन्याच्या माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मुळात पाकिस्तानचा भ्याड व छुपे हल्ले करण्यावर भर असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी ही त्यांची रणनीती आहे. जर युद्ध पेटलेच तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्याची चूक करणार नाही. जर त्यांनी असे केले तर भारताचा काही भाग नष्ट होईल. परंतु प्रत्युत्तरात संपूर्ण पाकिस्तान बेचिराख होईल. भारताचे कमी व पाकिस्तानचेच जास्त नुकसान होईल, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. थेट हल्ला करण्यापेक्षा पाकिस्तान दहशतवादी हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेवरदेखील पुढील काही काळ विशेष लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
चीनलादेखील बसेल फटका
जर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा उपयोग केला तर त्याचा फटका चीनलादेखील बसेल. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी चिनी कामगार विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. शिवाय अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचा फटका चीनलादेखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच पाकिस्तानला असे पाऊल उचलू देणार नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)