पाकिस्तानी हेर निशांत अग्रवाल नागपूर कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:06 AM2019-03-17T00:06:50+5:302019-03-17T00:07:14+5:30
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या निशांत अग्रवाल नामक हेराला लखनौ (उत्तर प्रदेश) एटीएसने गुरुवारी रात्री येथील नागपूर कारागृहात आणले. ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे निशांतला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय)च्या पथकाने अटक केली होती. तो गेल्या सहा महिन्यापासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीचा सामना करीत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या निशांत अग्रवाल नामक हेराला लखनौ (उत्तर प्रदेश) एटीएसने गुरुवारी रात्री येथील नागपूर कारागृहात आणले. ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे निशांतला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय)च्या पथकाने अटक केली होती. तो गेल्या सहा महिन्यापासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीचा सामना करीत होता.
नागपूरजवळच्या मोहगाव (डोंगरगाव) येथील डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लांट विभागात सिनियर सिस्टीम इंजिनिअर म्हणून चार वर्षांपासून निशांत अग्रवाल नोकरी करीत होता. सोनेगाव पोलीस ठाण्याजवळ असलेल्या उज्ज्वलनगरात मनोहर काळे यांच्या घरी तो पत्नीसह भाड्याने राहात होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. अत्यंत संवेदनशील आणि भारतीय सुरक्षेला छेदणारी माहिती तो पाकिस्तान तसेच अमेरिकन गुप्तचर संस्थांना फेसबुक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरवित होता. कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये बसलेले पाकिस्तानी हस्तक त्याच्याशी वारंवार ऑनलाईन संपर्कात असल्याचे मिलिटरी इंटेलिजन्सच्या लक्षात आल्याने त्याच्यावर तसेच कानपुरातील त्याच्या एका महिला मित्रावर नजर ठेवण्यात आली. या दोघांचे पाकिस्तानमधील हस्तकांसोबतचे कोड ट्रॅक केल्यानंतर यूपी एटीएस आणि एमआयने ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे नागपुरात धडक दिली. निशांत काम करीत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लांट तसेच त्याच्या निवासस्थानी छापा घातला होता. निशांतला अटक करून लखनौला नेण्यात आले होते. त्याच्याकडून लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलसह काही पेनड्राईव्हही जप्त करण्यात आले होते.
पाकिस्तानी हेर नागपुरात पकडण्यात आल्याने देशभर खळबळ उडाली होती. तेव्हापासून निशांत काही दिवस उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय) अधिकाऱ्यांच्या कस्टडीत होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील वेगवेगळ्या तपास पथकांनी त्याची चौकशी केली. अचानक त्याला गुरुवारी १४ मार्चला सायंकाळी यूपी एटीएसने प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत नागपुरात आणले. त्याला येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. निशांतला मध्यवर्ती कारागृहाच्या विशेष सुरक्षा विभागात ठेवण्यात आले आहे.