पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित आज नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 03:12 AM2016-06-02T03:12:29+5:302016-06-02T03:12:29+5:30
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित आज, गुरुवारी दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
लोकमत समूहाच्या नॉलेज सिरीज अंतर्गत उद्या चर्चासत्र
नागपूर : भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित आज, गुरुवारी दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत आहेत. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी आयोजित नॉलेज सिरीज अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध यावर आयोजित चर्चासत्रात ते सहभागी होतील.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित या चर्चासत्राबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेची खूप मागणी होत आहे. बरेच लोक प्रवेश पाससाठी लोकमत भवनातही पोहचले. भारत-पाकिस्तानच्या वर्तमान संबंधांबाबत नागरिकांना ऐकायचे व समजून घ्यायचे आहे. या चर्चासत्रात अब्दुल बासित हे मुख्य वक्ता असतील. याशिवाय थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी व काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आपले मत व्यक्त करतील. यावेळी प्रेक्षकांसोबत या दिग्गजांचे प्रश्नोत्तराचे सत्र होईल. ६९ वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या भारत-पाक या दोन भावांनी एकमेकांशी प्रेमाने राहावे, असे दोन्ही देशातील लोकांना वाटते. त्यामुळेच या दोन्ही देशात सुरू असलेल्या शांती प्रक्रियेवर जनतेचे बारीक लक्ष असते. त्याच पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होत असल्यामुळे नागरिकांना याची उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)
निवडक लोकांसाठी पास उपलब्ध
शुक्रवारी होत असलेल्या या चर्चासत्राचे पास निवडक लोकांसाठी अजूनही उपलब्ध आहेत. इच्छुकांना पाससाठी गुरुवारी, २ जून रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत पुनम महात्मे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९९२२९१५०३५ वर संपर्क करता येईल. प्रेक्षकांना विनंती आहे की, सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी कार्यक्रमाला सोबत येताना आपले ओळखपत्र आणावे.