नागपुरात राजवैभवी थाटात निघाली संत गजानन महाराजांची पालखी परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:41 PM2020-02-15T22:41:17+5:302020-02-15T22:51:30+5:30
संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली. ‘जय गजानन’ असा जयघोष आणि ‘गण गण गणात बोते’ अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले होते. फुलांची उधळण करीत आणि जयघोषात शहरातील अनेक भागातील मंदिरांमधून श्रींचा पालखी सोहळा निघाला. कीर्तन, गोपालकाला, महाप्रसाद आणि कार्यक्रमांचेही ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
त्रिमूर्तीनगर गजानन मंदिराच्या पालखी सोहळ्यात ८०० दिंड्यांचा सहभाग
त्रिमूर्तीनगर तलमले इस्टेट भागातील गजानन मंदिरातून शनिवारी सायंकाळी निघालेला संत गजानन महाराजांचा पालखी शोभायात्रा सोहळा यंदाही भाविकांच्या सहभागाने आणि अपार उत्साहाने पार पडला. नागपुरातील विविध भागातून तसेच विदर्भासह मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी राजवैभवी थाटात गजानन महाराजांची पालखी निघाली. ८०० च्या वर सहभागी झालेल्या भजनी दिंड्या आणि हजारो भविक हे यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला. दुपारी साडेचार वाजता श्रींची पालखी अश्व, रथ, मेणा, धूप आणि फुलांच्या वर्षाव करणाऱ्या तोफेसह राजवैभवी थाटात पश्चिम नागपूरच्या परिक्रमेसाठी निघाली. येथे आठवडाभरापासून महोत्सवाद्वारे प्रवचन, आख्यान, कीर्तन झाले. दुपारी महापूजेनंतर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन मंडळाचे प्रमुख राजू तलमले, मीना तलमले, अशोक धोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते यांनी केले. त्यानंतर मंदिरातून नगरपरिक्रमेकरिता मार्गस्थ झाली.
पालखी मंदिरातून निघून त्रिमूर्ती नगर चौक, पडोळे हॉस्पिटल चौक, गोपाल नगरातून माटे चौक, दुर्गा मंदिर, प्रतापनगर चौक, राधे मंगलम हॉल, एनआयटी गार्डन मार्गे मंदिरात परत आली. अनेक ठिकाणी पालखींची भक्तांनी पूजा केली. मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तांनी थंड पाणी, मसाले भात, सरबताचे स्टॉल लावले होते. शोभायात्रेतील देखाव्यांचे चित्ररथ, आदिवासी नृत्य आणि स्केंटिग करणारी लहान मुले अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काटोल, नरखेड, उमरेड, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या ८०० दिंड्या, पालखी, भजनी मंडळे सहभागी झाली. शोभायात्रेनंतर या सर्व भजनी मंडळ आणि दिंड्या प्रमुखांना श्रीफळ, हार आणि प्रमाणपत्र देऊन श्रीकांत पिसे, प्रशांत पिसे, प्रा, रमेश जिभकाटे, राजू मेंघरे, प्रमोद जोशी, चक्रधर बोढारे , विलास गाढवे, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रांगोळ्यांनी स्वागत
पालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या घालण्यात आला होत्या. तरुणाईने आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने रांगोळ्या घालून मार्ग सजविला होता. मार्गात अनेक ठिकाणी पालखी थांबवून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. हार, फुले, प्रसाद, नारळांची दुकानेही मंदिर परिसरात सजली होती. दिवसभर रांगा लावून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले.