२४ हजार घेऊन पळाला पालटकर; नागपूर पवनकर कुटुंबीय हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:45 AM2018-06-15T10:45:38+5:302018-06-15T10:45:48+5:30
सख्ख्या नात्यातील व्यक्तींच्या रक्तांचा सडा घालणारा क्रूरकर्मा पालटकर याने हत्याकांडानंतर कुठे पळून जायचे, ते आधीच ठरवून ठेवले होते. त्यासाठी त्याने पैशाचीही आधीच व्यवस्था करून ठेवली होती.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सख्ख्या नात्यातील व्यक्तींच्या रक्तांचा सडा घालणारा क्रूरकर्मा याने हत्याकांडानंतर कुठे पळून जायचे, ते आधीच ठरवून ठेवले होते. त्यासाठी त्याने पैशाचीही आधीच व्यवस्था करून ठेवली होती. होय, फरारीच्या काळात वापरण्यासाठी त्याने मोठी रक्कम आधीच जमवून ठेवली होती. त्याच्याजवळ थोडेथोडके नव्हे तर २४ हजार रुपये आहेत.
रविवारी, १० जूनच्या मध्यरात्रीनंतर किड्यामुंग्यांना मारावे तसे त्याने स्वत:चा चार वर्षांचा मुलगा कृष्णा, सख्खी बहीण अर्चना, बहिणीची मुलगी वेदांती, जावई कमलाकर पवनकर आणि त्यांची वृद्ध आई मीराबाई पवनकर या पाच जणांना क्रूरपणे ठार मारले. हे हत्याकांड करण्याचे कारस्थान त्याने आधीच रचून ठेवले होते. त्यामुळे त्याने मुद्दामहून सर्व सामसूम झाल्यानंतर रविवारी रात्री बहिणीचे घर गाठले. स्वत:चा मोबाईल बंद केला अन् पळून जाण्यासाठी पैशाचीही जुळवाजळव आधीच करून ठेवली. वडिलोपार्जित शेतीवर बहीण आणि जावई हक्क दाखवत असल्याचे पाहून क्रूरकर्मा पालटकरने यंदा ही शेती कोणत्याही परिस्थितीत जावयाच्या मनाने वाहायला द्यायची नाही, असे ठरवले होते. त्यामुळे त्याने गेल्या पाच वर्षांपासून शेतजमीन वाहणाऱ्या बावनकुळेंना दम देऊन ठेवला. त्यानंतर नागपूर आणि जिल्ह्यातील अनेक खतरनाक गुन्हेगारांकडे शेती विकण्यासाठी किंवा गहाण घालण्यासाठी चकरा मारल्या. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, त्याने गावातीलच भावकित असलेल्या ‘बाल्या’ला पटवले. १० पैकी ६ एकर शेती बाल्याला वर्षभराला वाहण्यासाठी ४५ हजारात दिली. त्यातील २४ हजार रुपये पालटकरने एक आठवड्यापूर्वी बाल्याकडून घेतले. उर्वरित शेती भाड्याने देण्यासाठी त्याने गावातीलच अरुणकडेही बरेच प्रयत्न केले. मात्र, आर्थिक कोंडीमुळे अरुणने नकार दिला. बाल्याने २४ हजार दिल्यानंतर २१ हजार दिवाळीत पीक हाती आल्यानंतर देण्याच्या अटीखाली त्याला रक्कम दिली.
हे २४ हजार रुपये घेऊन क्रूरकर्मा पालटकरने तो ज्या हॉटेलमध्ये काम करीत होता त्यांच्याकडूनही मे महिन्याचा पगार घेतला. त्याचा पगार बँकेत जमा होत होता, हत्याकांडाच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पगाराची संपूर्ण रक्कम बँकेतून काढून घेतली. त्याच्या बँक खात्यात केवळ ६० रुपये शिल्लक आहे.
अशाप्रकारे मोठी रक्कम हाताशी ठेवल्यानंतर या नराधमाने स्वत:चा मुलगा आणि सख्खी बहीण तसेच तिचे कुटुंब संपवले अन् बिनबोभाटपणे पळून गेला. त्याने हत्याकांडाचे आणि नंतर पळून जाण्याचा कट एवढा थंड डोक्याने रचला की, नागपूर शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी-कर्मचारी, आजूबाजूच्या शहरातील पोलीस आणि राज्याला लागून असलेल्या प्रांतातील पोलीस या नराधमाचा शोध घेत असूनही तो हत्याकांड घडविल्याच्या चार दिवसानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कुठून कसा, कशाने आणि कुठे पळाला, त्याचीदेखील माहिती पोलीस मिळवू शकले नाही.
मुलांना भंडाऱ्याला नेणार होता
क्रूरकर्मा पालटकरने एकीकडे बहिणीच्या कुटुंबीयांना संपविण्याचा घाट घातला होता. दुसरीकडे तो त्याच्या दोन्ही मुलांना भंडारा येथील एका वसतिगृहात टाकण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने प्राथमिक माहिती काढून ठेवली होती. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या त्याच्या मैत्रिणीने तिची दोन मुले भंडाऱ्यात ज्या वसतिगृहात ठेवली आहेत, तेथेच तो त्याच्या मुलांना ठेवण्यासाठी प्रयत्नशील होता. जावई आपल्या दोन मुलांच्या खर्चासाठी आपल्याला १० हजार रुपये मागतो, असेही त्याने मैत्रिणीला सांगितले होते. त्यामुळे मैत्रिणीने त्याला भंडारा वसतिगृहाची इत्थंभूत माहिती दिली होती. मात्र, बहिणीचे कुटुंब संपवण्याची त्याला एवढी घाई झाली होती की बाकी सर्वच त्याने मागे टाकले.
हत्याकांडाची नोंद कॅलेंडरवर
नंदनवनमधील थरारक हत्याकांडातील क्रूरकर्म्याने आपल्या बहिणीच्या कुटुंबीयांना संपविल्यानंतर स्वत:च्या घरातील कॅलेंडरवर तशी नोंद केली. थरारालाही थरारक वाटावे, असा हा हत्याकांडातील पैलू उजेडात आल्याने सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिसांचेही नेत्र विस्फारले आहे. कमलाकर आज मेला असे लिहून ठेवल्यानंतर आरोपीने पुन्हा आपल्या सैतानी डोक्यातील गरळ बाहेर काढली. त्याने ते पाण्याने पुसून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो नागपुरातून निघून गेला.