नैसर्गिक रंग व औषधी गुण असलेला पळस ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:07 AM2021-03-29T04:07:21+5:302021-03-29T04:07:21+5:30
नागपूर : आपण सर्वजण आज पारंपरिक रंगाेत्सव साजरा करण्यासाठी तयार आहाेत. काेराेनाची भीती असल्याने थाेडा नियमांचा काटेकाेरपणा आवश्यक आहे ...
नागपूर : आपण सर्वजण आज पारंपरिक रंगाेत्सव साजरा करण्यासाठी तयार आहाेत. काेराेनाची भीती असल्याने थाेडा नियमांचा काटेकाेरपणा आवश्यक आहे पण घरच्या घरी हा आनंद साजरा करायला हरकत नाही. रंगाेत्सव म्हटला की रंग आलेच. मात्र रासायनिक रंगांचा उपयाेग हा त्वचेसाठी आणि शरीरासाठीही हानिकारक आहे हे वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार ऐकलेच असेल. मग नैसर्गिक रंगांचा विचार केल्यावर हमखास आठवते ते पळसाचे झाड. त्यातून मिळणारा रंग त्वचेसाठी हानिकारक नाहीच, उलट त्याचे औषधी गुण शरीरासाठी लाभदायकच आहेत.
वसंत ऋतूची चाहुल लागताच शेतात, माळरानावर फुललेला दिसताे ताे पळस. त्याची भडक लाल, पिवळ्या रंगांची फुले लक्ष वेधून घेतात. ताे जंगलात वणवा लागल्यासारखा दिसताे. तसा जंगलातला खरा वणवा विदारकच पण पळसफुलांचा दिसणारा वणवा डाेळे आणि मनाला आनंद देणारा ठरताे. असे म्हणतात, पळस हे जंगल नष्ट हाेण्याचे, दुष्काळाचे चित्र आहे. मात्र त्याचा दुसरा अर्थही आहे. जिथे काहीच उगवत नाही अशा पडीत जमिनीवर पळस हमखास फुलताे. मात्र पळस जिथे आहे तिथे कधीकाळी जंगल हाेते आणि मानवी हस्तक्षेपामुळे ते नष्ट झाले, असे त्यातून स्पष्ट हाेते. वणवा लागल्यानंतर टिकून राहताे ताे पळस. त्यामुळे पळस ही फायटर वनस्पती आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पळसाचे नैसर्गिक आणि औषधी फायदे जाणणे आवश्यक आहे. वनस्पती तज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी पळस झाडाचे अनेक फायदे वर्णन केले.
- पळसाच्या पाना, फुलांपासून तयार हाेणारे नैसर्गिक रंग त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहेत. त्यामुळे गावातील व वन्य परिसरातील लाेक आताही पळसाचा उपयाेग करतात.
- शरीराचा दाह कमी करण्यासाठी पळसाच्या फुलांचा रस अत्यंत लाभदायक असताे.
- पक्ष्यांसाठी पळसफुलांचा मधुरस आवडीचा असताे. त्यामुळे पळस फुलला की पक्षी व किड्यांची माैज असते.
- हा मधुरस माणसांसाठीही चांगला असताे. पाेटातील विकार दूर करणारा असताे.
- पानांचा रस त्वचेचे आजार कमी करण्यासाठी लाभदायक असताे.
- पळसाच्या झाडावर लाखाचे किडे माेठ्या प्रमाणात येतात. त्याची लाळ ही ज्वलनशील असते. हा पदार्थ दागिने बनविण्यासाठी उपयाेगात येताे.
नैसर्गिक रंगांसाठी इतर महत्त्वाच्या वनस्पती
गाेकर्ण वेलाला येणारी जांभळी फुले रंग तयार करण्यास महत्त्वाची असतात. याशिवाय हळद, बीट मुळे, निंबाचे झाड, काॅफी, लिंबू आदी वनस्पतींच्या पानाफुलांचे एकमेकांत मिश्रण करून चांगले रंग तयार केले जातात.