पालटकर हत्याकांड; पोलीस आजूबाजूच्या राज्यात शोधत होते अन् क्रूरकर्मा पंजाबमध्ये दडून होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 09:05 PM2023-04-01T21:05:29+5:302023-04-01T21:05:56+5:30
Nagpur News क्रूरकर्मा विवेक पालटकर याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, वैष्णोदेवीसह काश्मीर राज्यातील वेगवेगळ्या भागात शोधाशोध करीत होते. हा क्रूरकर्मा मात्र सैनिवाल (लुधियाना, पंजाब) मध्ये दडून बसला होता.
नरेश डोंगरे
नागपूर : उपराजधानीकरांच्या हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या आणि राज्यभरात चर्चेला आलेल्या नंदनवनमधील मर्डर मिस्ट्रीचा आरोपी, क्रूरकर्मा विवेक पालटकर याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, वैष्णोदेवीसह काश्मीर राज्यातील वेगवेगळ्या भागात शोधाशोध करीत होते. हा क्रूरकर्मा मात्र सैनिवाल (लुधियाना, पंजाब) मध्ये दडून बसला होता. हे थरारकांड उघड झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी २१ जूनला तो पोलिसांच्या हाती लागला होता.
पालटकरला न्यायालयाने आज दोषी करार दिल्यानंतर या बहुचर्चित सामुहिक हत्याकांडाच्या कटू आठवणी चर्चेला आल्या आहेत. आरोपी कसा फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याला कशा बेड्या ठोकल्या, त्या घटनाक्रमाचीही पोलीस विभागात चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार, हे हत्याकांड घडविल्यानंतर आरोपी स्वत:च्या रुमवर पोहचला. त्याने तेथे पूजा केली. कॅलेंडरवर त्या सर्वांच्या नावावर फुल्या मारल्या आणि सकाळी ९ वाजता रेल्वेस्थानकावर पोहचला. रेल्वेने त्याने थेट दिल्ली गाठली. तेथून तो लुधियानाला पोहचला. तेथे एका मजुराला त्याने आपण बाहेरून आलो, येथे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय नाही. कुठे काम असेल तर सांग असे म्हणत त्याच्या मदतीने लुधियानाच्या सैनीवाल भागातील औद्योगिक परिसरात काम शोधले. बाजूलाच एका चाळीत दोन मजुरांसोबत चार हजार रुपये महिन्यांची रूम भाड्याने घेतली आणि आरोपी तेथे राहू लागला होता.
लगेच भांडणावर येणाऱ्या पालटकरला ज्याने काम आणि रूम मिळवून दिली, त्याच्यासोबत तीनच दिवसांनी वाद घालून पालटकरने त्याच्यावर ५० हजार रुपये आणि २ मोबाईल चोरण्याचा आरोप लावला होता. या वादानंतर 'त्या' व्यक्तीने पालटकरचा मोबाईल सुरू केला अन् क्षणाक्षणाला लक्ष ठेवून असणाऱ्या पोलिसांना आरोपीच्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन कळाले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सैनिवाल, लुधियानाला पोहचून त्याच्या २१ जूनला मुसक्या बांधल्या होत्या.
आयपीएस हेमराज ढोकेंची महत्वाची भूमिका !
या थरारक हत्याकांडातील आरोपीला जेरबंद करण्यात मुळचे काटोल (जि. नागपूर) आणि त्यावेळी पंजाबमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस हेमराज ढोके यांनी महत्वाची भूमीका वठविली होती. कारण आरोपी पालटकरचा मोबाईल १९ जून रोजी सुरू होताच त्याचे लोकेशन ट्रेस झाले असले तरी तेथे पोहचून त्याला तातडीने अटक करणे नागपूर पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे तत्कालीन सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त शामराव दिघावकर, सध्या उत्तराखंडमध्ये असलेले तत्कालिन झोन चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आयपीएस ढोके यांच्याशी संपर्क साधला अन् लुधियाना पोलिसांच्या मदतीने आरोपी पालटकरच्या मुसक्या बांधल्या होत्या.
२०१४ मध्ये केली होती पत्नीची हत्या
२०१४ मध्ये पालटकरने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनवाली. त्यानंतर त्याच्या शेतीच्या देखभालीची तसेच आरोपीच्या दोन मुलांची वैष्णवी आणि कृष्णाचीही जबाबदारी आरोपीचे जावई कमलाकर पवनकर यांनी सांभाळली होती. पत्नीच्या हत्याकांडात शिक्षा भोगणाऱ्या आरोपी पालटकरला उच्च न्यायालयात अपिल करून त्याला कारागृहातून बाहेर काढण्यासाठीही जावई पवनकर यांनीच धावपळ केली होती.
कारागृहातही हत्येचा प्रयत्न
क्रूरकर्मा पालटकरने आधी पत्नी आणि त्याच्या चार वर्षांनंतर स्वत:च्या मुलासह बहिणीचेही कुटुंब संपविले. पोलिसांनी त्याला कारागृहात डांबल्यानंतर तो तेथेही भाईगिरी करीत होता. गेल्या वर्षी त्याने कारागृहात एकाशी वाद झाल्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याचा पाच जणांच्या हत्येचा दोष सिद्ध झाल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि विधी वर्तुळातून चर्चेला आली आहे.