स्वत:चा मुलगा अन् बहिणीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पालटकरला फाशी

By नरेश डोंगरे | Published: April 15, 2023 04:09 PM2023-04-15T16:09:06+5:302023-04-15T16:09:32+5:30

सत्र न्यायालयाचा निर्णय

Paltkar, who killed five people including his own son and sister, sentenced to death | स्वत:चा मुलगा अन् बहिणीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पालटकरला फाशी

स्वत:चा मुलगा अन् बहिणीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पालटकरला फाशी

googlenewsNext

नागपूर : स्वत:चा पाच वर्षीय मुलगा, सख्खी बहिण आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाबराव पालटकर (वय ४२) याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी शनिवारी हा निर्णय दिला.

पालटकरच्या क्रोर्याला बळी पडलेल्यांमध्ये त्याचा स्वत:चा मुलगा कृष्णा (वय ५ वर्षे), सख्खी बहिण अर्चना पवनकर (वय ४५) अर्चनाचे पती कमलाकर मोतीराम पवनकर (वय ४८), मुलगी वेदांती (वय १२) आणि कमलाकर यांची आई मीराबाई (वय ७३)यांचा समावेश आहे.

पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. कमलाकर प्रॉपर्टी डिलर होते. तसेच, ते घरीच वैष्णवी इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान चालवित होते. आरोपी विवेक कमलाकर यांचा साळा होता. त्याने पत्नीची हत्या केल्याच्या आरोपात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनवाली होती. तो कारागृहात बंदिस्त होता. त्याला न्यायालयातून जामिन मिळवून कारागृहातून बाहेर आणण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीला पैसे मागत होते.

आरोपी त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे आरोपीने पवनकर कुटुंबीयांचा घात करण्याचा कट रचला होता. त्यानुसार, आरोपीने ११ जून २०१८ पहाटेच्या वेळी क्रूरकर्मा पालटकरने उपरोक्त पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. यावेळी आरोपीची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) या दोघीही घरातील दुसऱ्या रूममध्ये होत्या. त्यामुळे त्या बचावल्या. हत्या केल्यानंतर आरोपी पालटकर पंजाबमध्ये पळून गेला होता. त्याला शहर पोलिसांनी २१ जूनला अटक करून नागपुरात आणले होते. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणी सुरू झाली.

न्यायालयात सरकारतर्फे ॲड. अभय जिकार, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक तर, आरोपीतर्फे ॲड. ऋषिकेश ढाले यांनी कामकाज पाहिले. जिकार यांनी क्रुरकर्मा पालटकरविरुद्ध २९ साक्षीदार तपासले. याशिवाय त्यांनी अन्य विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हे सिद्ध करून फाशीच्या शिक्षेची मागणी केली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तीवाद लक्षात घेऊन शनिवारी निकालपत्राचे वाचन करताना क्रूरकर्मा पालटकरला फाशीची शिक्षा ठोठावली.

न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी

या बहुचर्चित हत्याकांडात न्यायालयाने आरोपी पालटकर याला १ एप्रिलला दोषी करार दिला होता. आज त्याला शिक्षा सुनावली जाणार असल्याचे आधीच जाहिर करण्यात आल्यामुळे निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात नागिरकांनी प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपायुक्त मदने स्वत: न्यायालय परिसरात बंदोबस्तावर नजर ठेवून होते.

Web Title: Paltkar, who killed five people including his own son and sister, sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.