नागपुरात पानटपऱ्या, चहाटपऱ्या, रेस्टॉरंट, खानावळी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 09:02 PM2020-03-19T21:02:24+5:302020-03-19T21:11:32+5:30

शहरातील खाद्यपदार्थांचे ८० ते ९० टक्के किरकोळ व्यवसाय बंद होते. काही थोडी उदाहरणे वगळता सर्वत्र खाद्यपदार्थांची विक्री बंद ठेवण्यात आली.

Pan shops, chats, restaurants, eateries closed in Nagpur | नागपुरात पानटपऱ्या, चहाटपऱ्या, रेस्टॉरंट, खानावळी बंद

नागपुरात पानटपऱ्या, चहाटपऱ्या, रेस्टॉरंट, खानावळी बंद

Next
ठळक मुद्देकिरकोळ सोडले तर प्रत्येकाने पाळला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने उपाय योजले जात आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगृहे बंद केल्यानंतर आता बार, रेस्टॉरंट, खानावळी तसेच चहाटपऱ्या आणि फूटपाथवरील खाद्यपदार्थ विक्रीवरही प्रशासनाने बंदीचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन करीत शहरातील खाद्यपदार्थांचे ८० ते ९० टक्के किरकोळ व्यवसाय बंद होते. काही थोडी उदाहरणे वगळता सर्वत्र खाद्यपदार्थांची विक्री बंद ठेवण्यात आली.



बसस्थानकासमोरील चहा, पोहे बंद
बसस्थानकासमोर दररोज सकाळपासून पोहे व चहाचे स्टॉल सुरू होतात. बसस्थानक असल्याने सकाळपासून या ठेल्यांवर प्रवाशांची गर्दी होत असते. गुरुवारी मात्र या परिसरातील सर्वच स्टॉल्स बंद आढळून आले. बंद ठेवण्याचे आदेश आल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अस्वच्छतेच्या वातावरणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. शिवाय ग्राहकांच्या गर्दीमुळे एकमेकांमार्फत संसर्ग होण्याची शक्यता मोठी असते. त्यामुळे ही दुकाने बंद करण्यात आली.

महाल परिसरातही चहा, पोह्यांची दुकाने बंद
महाल परिसरातही चहाटपऱ्या, पोह्यांची दुकाने, रेस्टॉरेंट बंद दिसून आले. कपडे आणि इतर दुकाने सुरू असताना खाद्यपदार्थांच्या दुकानांचा शुकशुकाट पसरला होता. चहाची दुकाने बंद होती पण काही ठिकाणी लपून चहाविक्री केली जात असल्याचे दिसले. महाल, बडकस चौक, अग्रसेन चौक, रेशीमबाग आदी परिसरात उघड्यावरील खाद्यविक्रीवर संचारबंदीच लागल्याचे चित्र होते.

टिळक पुतळा चौकात दिसला इडलीचा ठेला
चहा, पोह्यांची दुकाने आणि रेस्टॉरंट बंद असताना टिळक पुतळा चौकात फूटपाथवर एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने आदेशाला गालबोट लावलेच. इडली, सांभारवडा, मसाला डोसाचे बोर्ड लावलेल्या या विक्रेत्याने सर्रासपणे खाद्यपदार्थांचा ठेला सुरू ठेवला होता. धोकादायक म्हणजे नागरिकांनीही गर्दी ेटाळण्याऐवजी खाण्यासाठी गर्दी केली होती. असे नतदृष्ट विक्रेते आणि बेजबाबदार नागरिकांमुळेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो.

सकाळी केले सुरू, दुपारी बंद
आदेशानंतरही महाल व अग्रसेन चौक परिसरात काही रेस्टॉरंट गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आले होते. प्रशासनाचा कुठलाही आदेश आमच्यापर्यंत पोहचला नाही, असे कारण पुढे करीत रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. मात्र यानंतर परिसरातील जागरूक नागरिकांनीच रेस्टॉरंट बंद करण्यास सांगितले. त्यामुळे मालकांना नाईलाजास्तव रेस्टॉरंट बंद करावे लागले.

मनपाच्या एनडीएस पथकाचा जागृतीपर इशारा
महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या न्यूसेन्स डिटेक्शन स्कॉडने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पुरेपूर अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविले. त्यानुसार वेगवेगळ््या पथकांनी शहरात फिरून रेस्टॉरंट व खानावळी बंद करण्याबाबत जनजागृती केली. संग्रामसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातील पथकाने तुळशीबाग, सक्करदरा आदी परिसरात फिरून सुरू असलेली खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यास सांगितले. या परिसरात २० च्यावर रेस्टॉरंट व फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांनी समजाविले. आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिसांमार्फत कठोर कारवाईचा इशाराही या पथकाने दिला.

वर्धमाननगर, जगनाडे चौक, नंदनवन परिसरात शुकशुकाट

दुसरीकडे वर्धमाननगर, जगनाडे चौक, नंदनवन परिसरातही कोरोनाचा प्रभाव दिसून आला. प्रशासनाच्या आदेशानुसार या परिसरातील चहाटपºया, पोहे दुकाने व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळपासून बंद असल्याचे दिसून आले. कपडे, फार्मसी, हार्डवेअर, मोबाईल शॉपी व इतर दुकाने मात्र सुरळीतपणे सुरू होती.

ज्यूस, लिंबूपाणी मात्र सुरू
रेस्टॉरेंट, फूटपाथवरील खाद्यपदार्थ व चहाची बहुतेक दुकाने बंद होती, मात्र लिंबूपाणी व ज्यूसची दुकाने सर्वत्र सुरू असल्याचे दिसून आले. ज्यूस विक्रेत्यांना बंदीचा आदेश नाही काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Pan shops, chats, restaurants, eateries closed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.