पंचनामे ग्रामसभा तपासणार, शेतकऱ्यांना मिळणार त्रिस्तरीय मदत : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 08:27 PM2019-11-07T20:27:59+5:302019-11-07T20:29:53+5:30

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना त्रिस्तरीय मदत मिळणार आहे. नुकसानीसंदर्भातील पंचनामे स्वत: ग्रामसभा तपासणार असून एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही.

Panchanam Gram Sabha to check, farmers get three-level help: Guardian Minister Bawankule | पंचनामे ग्रामसभा तपासणार, शेतकऱ्यांना मिळणार त्रिस्तरीय मदत : पालकमंत्री बावनकुळे

पंचनामे ग्रामसभा तपासणार, शेतकऱ्यांना मिळणार त्रिस्तरीय मदत : पालकमंत्री बावनकुळे

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात १०,८६० हेक्टरवर नुकसान, प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना त्रिस्तरीय मदत मिळणार आहे. नुकसानीसंदर्भातील पंचनामे स्वत: ग्रामसभा तपासणार असून एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने गेल्या दोन महिन्यात सुमारे ३२ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतातील पिकाचे नुकसान झाले असून नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसभा घ्या. पंचनामे करून ग्रामपंचायतींना सर्वेक्षणाचे अहवाल सोपवा. ग्रामसभा ते अहवाल तपासतील, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आ. कृष्णा खोपडे, कृषी अधिकारी शेंडे उपस्थित होते. या संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात १०,८६० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा या पिकांचे नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे २१,९५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी जुलैमधील पावसाने ३९९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने या बैठकीत सादर केली.
येत्या ११, १२ व १३ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ७७८ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन प्रशासनाने केलेले सर्वेक्षणाचे अहवाल ग्रामसभेत द्या. ग्रामसभा ते अहवाल तपासतील. या ग्रामसभांना लोकप्रतिनिधी, तलाठी, कृषी सहायक हजर राहतील. त्यानंतर तहसिलदार, कृषी विकास अधिकारी हे अहवाल अंतिम करतील व त्या अहवालाची प्रत आमदारांना देतील. शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे हे अहवाल तपासून १५ नोव्हेंबरपर्यंत शासनाला पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रत्येक सर्वेक्षणावर कृषी सहायक, तलाठी आणि सरपंचाची स्वाक्षरी असली पाहिजे.
काटोल, नरखेड भागातील संत्र्याच्या पिकाचे नुकसान किती झाले, याचे सर्वेक्षणच कृषी विभागाने केले नाही. मात्र शेतकऱ्यांनी ९० टक्के संत्रा आणि कापसाचे पीक नष्ट झाल्याचा दावा केला आहे. तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. ३९ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. एकही शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रब्बीच्या हंगामासाठी १५ हजार क्विंटल हरभरा आणि ६ हजार क्विंटल गव्हाचे लक्ष्य आहे. पण ५ हजार क्विंटल गहू, हरभरा अनुदानातून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

पीक विमा अधिकाऱ्यांच्या नावांची लागणार यादी
५१ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, प्रत्येक ग्रामपंचायतीत पीक विमा कंपनीच्या समन्वयकाचे नाव व मोबाईल नंबर ग्रामपंचायतीत फलकावर लावण्यात येईल. त्यामुळे पीक विमा कंपनीचा समन्वयक कोण आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. येत्या दोन-तीन दिवसात असे फलक लावण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अशी मिळणार मदत
मदतीसंदर्भात शासनाच्या स्थायी सूचना आहेत. या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्याचप्रमाणे सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसारही मदत देण्यात येईल. ही रक्कम सरकार जाहीर करेल. तसेच विमा काढणाऱ्यांनाही विमा कंपनीकडून नुकसानापोटी मदत देण्यात येईल. अशी तीनस्तरीय मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Panchanam Gram Sabha to check, farmers get three-level help: Guardian Minister Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.