मानसिक आरोग्यासाठी ही ‘पंचसूत्री’ महत्त्वाची ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:20+5:302021-05-12T04:09:20+5:30

मेहा शर्मा नागपूर : कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य, रोजगार, व्यवसाय आणि कुटुंबाची सुरक्षा ...

The Panchasutri is important for mental health | मानसिक आरोग्यासाठी ही ‘पंचसूत्री’ महत्त्वाची ()

मानसिक आरोग्यासाठी ही ‘पंचसूत्री’ महत्त्वाची ()

Next

मेहा शर्मा

नागपूर : कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य, रोजगार, व्यवसाय आणि कुटुंबाची सुरक्षा अशा अनेक गोष्टींनी लोकांना ग्रस्त केले आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य कसे सांभाळावे, याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या परिस्थितीत तणावाचा सामना कसा करावा?

कोरोनामुळे आरोग्य, रोजगार, व्यवसाय अशा सर्व प्रकारचा तणाव येणे स्वाभाविक आहे. तो समजूतदारपणे स्वीकारला तर सामान्य बाब आहे. मात्र त्याचा परिणाम दैनंदिन कामावर झाला तर ती मोठी समस्या आहे. अशावेळी तो सांभाळण्याची गरज आहे. लोकांनी चारही बाजूने येणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. विश्वसनीय स्रोताकडून दिवसातून केवळ एकदाच बातम्यांवर लक्ष घालावे. सोशल मीडियामध्ये येणारी माहिती ग्राह्य धरू नका, एखाद्या विश्वसनीय वेबसाइटवरूनच माहिती घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगली झोप, सकाळी थोडा व्यायाम व २५-३० मिनिटे मेडिटेशन किंवा प्राणायाम करणे तर धूम्रपान व अमलीपदार्थांपासून दूर राहा व मद्यपान नियंत्रित करा आणि सर्वात शेवटचे म्हणजे तर्कसंगतपणे विचार करा. या पंचसूत्रीचा स्वीकार केल्यास तणाव दूर ठेवता येईल.

आर्थिक चिंता वाढली आहे?

यावर सहज उत्तर मिळणार नाही. खर्चावर मर्यादा घालणे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आता ही परिस्थिती शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि कदाचित सहा महिने, वर्षभरात ती सुधारेल, ही आशा मनात कायम ठेवा.

प्रियजनांच्या निधनामुळे अपराधीपणाची भावना कशी दूर होईल?

अपराधीपणाची भावना ही दु:खाच्या प्रक्रियेचा भाग आहे. प्रियजनांच्या निधनामुळे अपराधीपणाची भावना येणे ही सामान्य बाब आहे. कोरोना नसता तरीही ही भावना असतीच. मात्र कोरोनाकाळात भूतकाळाची चिंता करीत बसण्यात काही अर्थ नाही. आपण घेतलेले निर्णय हे परिस्थितीनुसार आणि त्यावेळेच्या गरजेनुसार घेतले होते. वेळ ही प्रत्येक दु:खावर फुंकर घालते आणि काळ जसा लोटेल तसे आपल्या वेदनाही कमी होतील.

तिसरी लाट येणार व मुलांवर जास्त परिणाम करणार, ही भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. ती दूर कशी करता येईल?

प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, तर काही आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. त्यामुळे ज्या नियंत्रणात आहेत, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला मी देईल. त्यामुळे आपल्या मुलांच्या बाहेर जाण्यावर मर्यादा घाला, त्यांना सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी मदत करा आणि मूलभूत स्वच्छतेकडे लक्ष देण्यास प्रेरित करा.

लोक एकमेकांना कशी मदत करणार?

संवादाची दारे खुली ठेवा. आशावाद आणि सकारात्मकतेचा प्रसार करा.

लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी सरकार काय करू शकते, पुरेसे लक्ष दिले जात आहे, असे वाटते का?

जेव्हा महामारीला सुरुवात झाली तेव्हा इतरांना मदत करण्यासाठी आपण आशावादी होतो. पहिल्या लाटेच्या वेळी प्रशासनाच्या मदतीने लोकांना मदतही केली आहे. मात्र दुसऱ्या लाटेच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने प्रत्येकाला मदत करणे अशक्य होऊन गेले. जमीनस्तरावर मानसोपचारतज्ज्ञांची हेल्पलाइन सुरू करण्यात आली. जेव्हा सरकार कमी पडते तेव्हा स्थानिक संस्थांनी पिचिंग करणे आवश्यक आहे.

मानसिक आरोग्याबाबत समाज म्हणून आपण कोठे आहोत?

बऱ्याच गोष्टी आता बदलल्या आहेत. ३०-३५ वर्षांपूर्वी लोक मानसिक आरोग्याबाबत जागृत नव्हते व फार थोडे लोक उपचारासाठी येत होते. आता वैवाहिक तंटे, करिअरबाबत तणाव, डिप्रेशन अशा सामान्य समस्यांसाठी लोक मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतात. आयडियल परिस्थितीपासून आपण दूर असलो तरी स्थिती सुधारली आहे. मात्र मानसोपचाराबाबत असलेला भ्रम आजही आहे. समुपदेशकांची मदत घेणे अधिक पसंत केले जाते.

मेडिक्लेम विम्यामध्ये मानसिक आजाराचा समावेश करावा?

२०१७ पासून ते बंधनकारक करण्यात आले आहे आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.

शारीरिक सुदृढता व मानसिक आरोग्यामध्ये काय संबंध आहे?

होय, त्यांच्यात पक्का संबंध आहे. विचार मेंदूवर नियंत्रण ठेवतात, मेंदू संपूर्ण शरीराला नियंत्रित करते.

रुग्णांमध्ये औषधोपचाराबाबत असलेला भ्रम कसा तोडावा?

ओषधोपचाराबाबतची भीती गैरसमजातून निर्माण झाली आहे. त्यामुळे औषधांबाबत असलेल्या शंका बोलून दाखवाव्यात. डॉक्टर व रुग्णांनी सहकारी म्हणून संवाद साधणे गरजेचे आहे. रुग्णांसमोर पर्याय ठेवावे. मात्र डॉक्टर पर्यायाबाबत चर्चा करण्याऐवजी रुग्णांशी आश्रय दिल्याप्रमाणे वागतात, ही खरी समस्या आहे.

महामारीच्या काळात लोकांना काही सूचना?

तुमच्या क्षमतेनुसार सावधगिरीचे नियम पाळणे नितांत गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायम आशावादी राहावे कारण ही परिस्थितीसुद्धा एक दिवस संपणार आहे.

Web Title: The Panchasutri is important for mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.