पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी झाली आभामय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 05:20 PM2022-10-03T17:20:42+5:302022-10-03T17:22:15+5:30
Nagpur News ३ ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या जनसागराच्या सोयींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नागपूर : ज्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले. ती दीक्षाभूमी ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजली आहे. माणसा-माणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी आभामय झाली आहे. ३ ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या जनसागराच्या सोयींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी उभारण्यात येणारे भव्य धम्ममंच, पंचशिलाचे झेंडे व आकर्षक रोषणाईच्या कामासाठी आंबेडकरी चळवळीतीलच कार्यकर्ते सतत झटत आहेत.
-जागोजागी धम्मध्वज
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी ही निळ्या पाखरांनी आणि धम्म ध्वजांनी सजते. या वर्षीही जागोजागी धम्मध्वज लावण्यात आले आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशिलेला अनुसरून असलेला, हा पंचशील ध्वज स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तुपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले आहे.
-चोवीस तास पिण्याचे पाणी
दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी महानगर पालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कायमस्वरूपी नळांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- सफाईची जबाबदारी ९०० कर्मचाऱ्यांवर
८ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरूपाची शौचालय व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी व महानगर पालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येणार आहेत.
- आरोग्याची विशेष काळजी
दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध वैद्यकीय संघटनांनी घेतली आहे. माता कचेरी परिसरात (हेल्थ झोन) तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहे. महानगर पालिका, आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने हे झोन काम करेल. मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत.