पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:35 AM2017-09-29T01:35:31+5:302017-09-29T01:35:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाºया पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी सजली आहे. गुरुवारी पंचशीलेचा ध्वज खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरू होते.
शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्गव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. दीक्षाभूमीवर या दिनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपºयातून येणाºया आंबेडकरी अनुयायांच्या सोयींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी उभारण्यात येणारे भव्य धम्ममंच, पंचशीलाचे झेंडे व आकर्षक रोषणाईच्या कामासाठी आंबेडकरी चळवळीतीलच कार्यकर्ते सतत झटत आहेत.
जागोजागी पंचशील ध्वज
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनी दीक्षाभूमी ही निळ्या पाखरांनी आणि पंचशील ध्वजाने सजते. यावर्षीही जागोजागी धम्मध्वज लावले जात आहेत. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलल्या पंचशीलेला अनुसरून असलेला हा पंचशील ध्वज स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तुपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले जात आहेत.
२४ तास पिण्याचे पाणी
दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांसाठी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कायमस्वरूपी नळांना २४ तास पाणी पुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टॅन्डपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सफाईची जबाबदारी ९०० कर्मचाºयांवर
२९ व ३० सप्टेंबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे यादरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरूपाची शौचालय्े व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व महानगरपालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाशव्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
धम्म बांधवांसाठी आरोग्य शिबिर
दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध वैद्यकीय संघटनांनी घेतली आहे. माता कचेरी परिसरात (हेल्थ झोन) तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहे. महानगर पालिका, आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने हे झोन काम करेल. मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. चार मोबाईल रुग्णवाहिका काचीपुरा पोलीस चौकी, बजाजनगर पोलीस चौकी, तसेच लक्ष्मीनगर चौकी जवळ या रुग्णवाहिका राहतील.
मुख्य सोहळा उद्या
नागपूर : प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा केला जात आहे. हा ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून बुधवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात दररोज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.
दूरदर्शनवर थेट प्रसारण
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि युसीएन या नागपुरातील वाहिन्यांवरून होणार आहे.
शनिवारी बुद्धवंदना घेण्याचे आवाहन
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. याचवेळी संपूर्ण नागपुरातील बुद्धविहारात बुद्ध वंदना घेण्यात यावी, असे आवाहन स्मारक समितीच्यावतीने सदानंद फुलझेले यांनी केले आहे.
पंचशील झेंड्याचे आज ध्वजारोहण व धम्मपरिषद
२९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. विलास गजघाटे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने पंचशील झेंड्याला मानवंदना दिली जाईल. तसेच सायंकाळी ६ वाजता धम्मपरिषद होईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी राहतील.