‘पांडवा अरूणेई’ नव्या कोळी प्रजातीचा शोेध
By admin | Published: May 29, 2017 04:03 PM2017-05-29T16:03:38+5:302017-05-29T16:03:38+5:30
स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील कोळी (स्पायडर) प्रयोगशाळेत येथील संशोधकांच्या चमूने ३४ कोळी कुळांचा शोध लावला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील कोळी (स्पायडर) प्रयोगशाळेत येथील संशोधकांच्या चमूने ३४ कोळी कुळांचा शोध लावला. विशेष म्हणजे यापैकी काही कोळी प्रजातींची भारतात प्रथमच नोंद झाली असून काही कोळी प्रजाती तर जगालादेखील नवीन आहेत. संशोधनात सापडलेल्या नवीन प्रजातींना संशोधकांच्या चमूने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरूण शेळके यांच्या नावाच्या अनुषंगाने ‘पांडवा अरूणेई’ असे नाव दिले आहे.
दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील प्रयोगशाळेत हा आगळा प्रयोग करणारे संशोधक आहेत अतुल बोडखे. आता नव्याने संशोधित कोळी प्रजातींना ‘पांडवा अरूणेई’ या नावाने जगभरात ओळखले जाईल. सन २०१२ पासून ही प्रयोगशाळा सुरू आहे. डीएसटी (डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) भारत सरकार अंतर्गत लोणार सरोवर परिसरात आढळणाऱ्या कोळ्यांचा अभ्यास केला जात आहे. संशोधनात आढळलेल्या कोळी प्रजाती या ‘टायट्यानोसीडी’ या कोळ्यांच्या कुळातील आहेत. या कुळाचा शोध सन १९६७ मध्ये "लेटनिन" शास्त्रज्ञांनी लावला होता.
या कुळातील पांडवा या ‘जिन्स’च्या एकूण ५३ प्रजाती जगभरात असून यापैकी एकूण ६ प्रजाती भारतात आढळतात. त्याचप्रमाणे चीन, कंझानिया, केनिया, मदागास्कर, श्रीलंका, न्यू गेणीया, जर्मनी, हंगेरी, म्यानमार, थायलंड व पाकिस्तान या देशांमध्ये याची नोंद झाली आहे. भारतामध्ये पांडवा शिवा, पांडवा गणेशा, पांडवा कामा, पांडवा गंगा, पांडवा सरस्वती, पांडवा अध्रका इत्यादी प्रजाती भारतात आढळून येतात. नव्याने आढळलेली पांडवा अरूणेई ही ही कोळी प्रजाती निशाचर असून ती लहान गवतात आढळते. रात्रीच्या वेळी हा कोळी (स्पायडर) गवतातील किटकांना मारून गवताची वाढ होण्यास मदत करतो. कोळ्याची लांबी ५.९ एम.एम. इतकी असते.
मातीचा पोत सुधारण्यासही हे कोळी मदत करतात. लाल-पिवळसर रंगाच्या पांडवा अरूणेई कोळ्याला पांढुरक्या रंगाचे आठ डोळे असतात. प्रथमत: हा कोळी ( स्पायडर) २०१५ मध्ये लोणार सरोवरातील गवताळ भागात आढळला. त्यांनतर या कोळ्याचे उर्वरित संशोधन सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर येथील कोळी संशोधन प्रयोगशाळेत संशोधक अतुल बोडखे, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथील शास्त्रज्ञ वीरेंद्र प्रताप उनियाल, सुभाष कांबळे, श्रीपाद मंथेन, गजानन संतापे, महेश चिखले यांनी केले.
जगविख्यात ‘जर्नल सर्किट’ मध्ये समावेश
सन २०१५ मध्ये या कोळी प्रजातींवर शोधप्रबंध तयार करून जगभरातील रिसर्च पेपर्स प्रकाशित करणाऱ्या अफ्रिकेतील नामवंत ‘जर्नल सर्किट’ या मॅगझिनला पाठविण्यात आले. यामध्ये हा कोळी प्रजातींवरील शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. या संशोधनाबद्दल सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे, प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांनीदेखील सहकार्य केले.
लोणार सरोवर परिसरातून ३४ कोळी कुळांमधील १२० प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. १२० पैकी एक प्रजाती नवीन असल्याने त्या प्रजातीला ‘पांडवा अरूणेई’ हे नाव देण्यात आले आहे.
- अतुल बोडखे,
संशोधक,
कसे दिले अरूणेई नाव?
‘इंटरनॅशनल झुआॅलॉजिकल नॉमेंक्लेचर’च्या नियमानुसार ‘स्पेसिस’ नाव हे लेटिन असायला पाहिजे. त्यामुळे अरूण वरून ‘अरूणेई’ असे नाव संशोधकांनी या नवीन स्पायडर प्रजातीला दिले आहे.