पांडे, कुरैशी, गोवारदीपे यांची विजयी पताका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 08:36 PM2019-07-22T20:36:34+5:302019-07-22T20:38:25+5:30
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ सदस्यांसाठी २८ मार्च २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत परिजात पांडे (क्र.-४), आसिफ कुरैशी (क्र.-१४) व अनिल गोवारदीपे (क्र.-१८) या तीन नागपूरकर वकिलांनी विजयी पताका फडकवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ सदस्यांसाठी २८ मार्च २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत परिजात पांडे (क्र.-४), आसिफ कुरैशी (क्र.-१४) व अनिल गोवारदीपे (क्र.-१८) या तीन नागपूरकर वकिलांनी विजयी पताका फडकवली.
अन्य विजयी उमेदवारांमध्ये आशिष देशमुख (क्र.-१ / पुसद, जि. यवतमाळ), गजानन चव्हाण (क्र.- २ / ठाणे), विठ्ठल देशमुख (क्र.- ३ / मुंबई), राजेंद्र उमप (क्र.- ५ / पुणे), जयंत जायभाये (क्र.- ६ / नाशिक), हर्षद निंबाळकर (क्र.- ७ / पुणे), अविनाश आव्हाड (क्र.- ८ / पुणे), संग्राम देसाई (क्र.- ९ / सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (क्र.- १० / औरंगाबाद), विवेकानंद घाटगे (क्र.-११ / मुंबई), मोतीसिंग मोहता (क्र.-१२ / अकोला), अण्णाराव पाटील (क्र.-१३ / लातूर), उदय वारुंजीकर (क्र.-१५ / मुंबई), मिलिंद पाटील (क्र.-१६ / उस्मानाबाद), मिलिंद ठोबडे (क्र.-१७ / सोलापूर), सतीश देशमुख (क्र.-१९ / हिंगोली), अमोल सावंत (क्र.- २० / औरंगाबाद), अविनाश भिडे (क्र.-२१ / नाशिक), सुभाष घाटगे (क्र.-२२ / मुंबई), सुदीप पासबोला (क्र.-२३ / ठाणे), वसंत भोसले (क्र.-२४ / सातारा) व अहमद खान पठाण (क्र.-२५ / पुणे) यांचा समावेश आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निवडणूक न्यायाधिकरणने निवडणुकीशी संबंधित सर्व तक्रारी निकाली काढून, या वकिलांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासंदर्भात सोमवारी आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्र व गोवामधील एकूण १६४ उमेदवारांनी ही निवडणूक लढवली होती. त्यात नागपूरच्या वरील तिघांसह किशोर लांबट, संग्राम सिरपूरकर, ईश्वर चर्लेवार, सुदीप जयस्वाल, सुनील लाचरवार व अनुपकुमार परिहार (एकूण-९) यांचा समावेश होता.
गुणरत्ने सदावर्ते अपात्र ठरले
मुंंबई येथील गुणरत्ने सदावर्ते यांनी सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते घेतली होती. ते विजयी उमेदवारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. दरम्यान, निवडणूक न्यायाधिकरणने ११ जुलै २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे सदावर्ते यांना आचारसंहितेचा भंग व अन्य विविध कारणांनी कौन्सिलच्या सदस्यपदासाठी अपात्र ठरवले. त्यामुळे विजयी उमेदवारांमधून त्यांचे नाव वगळण्यात आले.
वादामुळे लांबली निवडणूक व निकाल
विविध प्रकारचे वाद व राजकीय डावपेचांमुळे आधी कौन्सिलची निवडणूक लांबली व निवडणूक झाल्यानंतर निकालही लांबला. कौन्सिलच्या गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला आहे. परंतु, निवडणुकीसाठी २८ मार्च २०१८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. तसेच, निवडणुकीनंतर अनेकांनी दाखल केलेल्या विविध तक्रारींमुळे निकाल थांबवून ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यातील सर्वाधिक मते गोवारदीपे यांना
नागपूर जिल्ह्यातील पहिल्या पसंतीची सर्वाधिक ८०१ मते अनिल गोवारदीपे यांना मिळाली. पांडे यांना ७७८, जयस्वाल यांना ४८९, कुरैशी यांना ४०६, सिरपूरकर यांना ३७३, लांबट यांना २०७, चर्लेवार यांना ३२, लाचरवार यांना २६ तर, परिहार यांना १७ पहिल्या पसंतीची मते मिळाली. नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात ५५०८ पैकी ३५८१ तर, उच्च न्यायालयात ७८१ पैकी ६४४ मतदारांनी मतदान केले होते.