नागपुरातील पांढराबोडी, शताब्दीनगर हॉटस्पॉटच्या उंबरठ्यावर! एक रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:58 PM2020-05-08T22:58:19+5:302020-05-08T23:11:37+5:30
सतरंजीपुऱ्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथील रुग्णांची संख्या १०३ तर मोमिनपुऱ्यात ८६ रुग्ण असल्याने या दोन्ही वसाहती ‘हॉटस्पॉट’ ठरल्या आहेत. गुरुवारी पांढराबोडी व शताब्दीनगरातील ‘सारी’चा प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दोन्ही वसाहती ‘हॉटस्पॉट’ तर होणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुऱ्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथील रुग्णांची संख्या १०३ तर मोमिनपुऱ्यात ८६ रुग्ण असल्याने या दोन्ही वसाहती ‘हॉटस्पॉट’ ठरल्या आहेत. गुरुवारी पांढराबोडी व शताब्दीनगरातील ‘सारी’चा प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दोन्ही वसाहती ‘हॉटस्पॉट’ तर होणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. नागपुरात आज आणखी एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णांची संख्या २६९ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, सतरंजीपुऱ्यातील ५० वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६६ वर गेली आहे. ‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेला रुग्ण. याला वैद्यकीय भाषेत ‘ सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणतात. या आजाराचे तीन रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये संशयित म्हणून उपचार घेत होते. गुरुवारी या तिन्ही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेने कमी असल्याने ‘हायरिस्क’ रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जाते. हे रुग्ण शताब्दीनगर, पांढराबोडी व मोमिनपुऱ्यातील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शताब्दीनगर व पांढराबोडी या वसाहतीतून पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली आहे. या दोन्ही वसाहतीत दाटीवाटीने घरे वसलेली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, पार्वतीनगर मृत युवक व शताब्दीनगर युवक हे संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे.
रुग्णसंख्या २६९
नागपुरात बुधवार व गुरुवार अशा दोनच दिवसात रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली. यामुळे आज शुक्रवारला किती रुग्णांचे निदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणातील ३०० वर नमुने तपासण्यात आल्याने नागपुरातील फार कमी नमुने तपासले गेले. मेडिकलने नागपुरातील तपासलेल्या नमुन्यात मोमिनपुरा रहिवासी असलेला ४५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाईन होता. रुग्णाला मेडिकमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या २६९वर गेली आहे.
सारीचे १६ रुग्ण मेडिकलमध्ये
सारीचे जुने १५ तर आज एक नवीन रुग्ण भरती झाला. यात १० पुरुष व सहा महिला आहेत. या सर्व रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून शनिवारी अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
६६ रुग्ण कोरोनामुक्त
सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेली ५० वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली. या महिलेचा नमुना २४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर महिलेला मेयोमध्ये दाखल केले. आज १४ दिवसानंतर तिचे नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णासह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ४२८
दैनिक तपासणी नमुने ३४८
दैनिक निगेटिव्ह नमुने २८८
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २६९
नागपुरातील मृत्यू ०३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६६
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,५९८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,३२१
पीडित-२६९-दुरुस्त-६६-मृत्यू-३
सुदामनगरी, काशीनगर व पार्वतीनगर वस्त्या सील
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्याने शुक्रवारी धरमपेठ झोनमधील ट्रस्ट ले -आऊट,सुदामनगरी, हनुमान नगर झोन मधील काशीनगर, टेकाडे हायस्कूल तर धंतोली झोनमधील पार्वतीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून या परिसरातील वस्त्या सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी जारी केले.
धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३५ मधील पार्वतीनगर, हनुमानगर झोन अंतर्गत येणाºया प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल परिसर, तसेच धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले-आऊट,सुदामनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जारी करण्यात आला आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी तीन प्रभागातील वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहे.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांची चिता वाढली आहे.